Skip to main content

मी जिजाऊ बोलतेय

पौष पौर्णिमा शके 1519 मध्ये म्हाळसा राणी आणि लखोजी राजे यांच्या घरी जन्माला आले तेव्हा दारा- दारांमध्ये रांगोळ्या काढल्या गेल्या, तोरण लावली गेली, हत्तीवरून साखर वाटण्यात आली.आमचं नाव जिजा ठेवण्यात आलं. जिजा म्हणजेच जय आणि विजय. आजूबाजूला सरदारांची वर्दळ, युद्धाचे डावपेच,सल्लामसलत, रयतेची गाऱ्हाणी...न्यायनिवाडे तर नित्याचेच हे असं होत आमचं बालपण. युद्धकला तर आम्ही शिकलोच होतो पण त्याचबरोबर 700 च्या वर आम्ही मुलींची 1 फौज तयार केली होती. पहाटे- पहाटे जेव्हा आम्ही घोड्यावरून रपेट करायला जायचो तेव्हा गावकुसातल्या काही बायका कौतुक करायच्या आणि काही नाकही मुरडायच्या, काही म्हणायच्या .. या पोरींचं कस होईल पण आम्ही निश्चय केलेला, स्वतः सोबत ...इतरांचं रक्षण करता आलं पाहिजे. म्हाळसा राणीच्या इच्छे खातर आम्ही 6 भाषा शिकलो,...मराठी, संस्कृत, उर्दू, अरबी, फारसी, कन्नड. रामायण- महाभारताबरोबरच, नामदेवांची गाथा, कबिराचे दोहे, कुराण, बायबल आम्ही वाचलं आणि समजूनही घेतलं आणि आमच्या मनात प्रश्न निर्माण झाला,...धर्म म्हणजे काय?..धर्म म्हणजे मानव सकल कल्याण कि कर्म कांड?, आम्ही तलवार चालवतो कुणासाठी?, परकीयांची चाकरी आम्ही का करायची ?, झुंजीत झुंजणार आपण, मरणार आपण आणि मारणारही आपण...आणि मिळून येतो तो शाह-बादशहा, आम्ही स्वतःसाठी का झुंजत नाही? आणि कसल आलंंहे पारतंत्र्यातल मुर्दाड जगण….हे सगळे विचार आमच्या मनात वादळ निर्माण करत होते. अवघी रयत अत्याचाराला कंटाळली होती, अबलांच्या आर्त किंकाळ्यांनी सह्याद्रीलाही जाग येत नव्हती जणू प्रतिकार शक्तीच संपली होती. तो अन्याय, अत्याचार पाहून तळपायाची आग मस्तकात जायची. आम्हाला प्रश्न पडला आम्ही वडिलांना विचारले, हे कुणी का संपवत नाही, आपण स्वतःसाठी का झुंजत नाही?, लखोजी राजांनी उत्तर दिलं, मराठ्यांनी याच भूमीवर आसमंताकडे बघून तुताऱ्या फुंकल्या, हर हर महादेवाच्या गर्जनेत...ढाल तलवारी लढवल्या पण हा समाज एकसंघ नाही. तो विखुरला गेला आहे. जाती धर्माची उतरण पक्की झालीये...पारतंत्र्याची चीड नाही, स्वातंत्र्याची ओढ नाही….जिजा, समाजाला बांधून ठेवतो तो एकसंघ स्वातंत्र्य विचार.
आम्ही पुन्हा विचारलं, आम्ही एक विचारासाठी काय करावं? आम्ही पाहतोय...गेल्या कित्येक वर्षांपासून आपण पारतंत्र्याच्या अंधारखाली चाचपडतोय… शब्दांची जुळवणी करत पुन्हा वडिलांनी उत्तर दिलं, बेटा, जिथे रयतेचा छळ होतो, रक्ताचे पाट वाहतात तिथे गवतालाही भाले फुटतात, मातीतील उमलणाऱ्या सहस्त्र कोंबाना जगण्याचं दान मिळत ते स्वातंत्र्याच्या सुर्यामुळे पण हा सूर्य असा सहजासहजी वर येत नाही., त्यासाठी पारतंत्र्याच्या श्वास कोंडावा लागतो, मनगटात बळ आणून तलवारीचे घाव घालावे लागतात, माणूस जातीला पेटाव लागत. अहो...मुर्दाड शरीराला जाग करावं लागत, त्यांच्या हातात पेटत्या मशाली द्याव्या लागतात.”
एक एक शब्द आम्ही मनात साठवत होतो. रयतेची वेदना आम्हाला असह्य होत होती. मनात विचार आला, हे मुधाई...किती सोसलस...यवनांनी कापून फेकून दिलेल्या माझ्या लेकरांची प्रेतं हि तू वाहून नेलीस, अब्रू लुटून नेलेल्या लेकी, सुनांना तू काठावर स्थान दिलंस, पेटती गाव विझवत राहिलीस, काठावर स्मशान बनवलंस ...पण आता विझत - विझवत बसायचं नाही. आता फक्त पेटायच आणि कसं पेटायच ते मी तुला सांगेन….
आमचा हा विश्वास शहाजी राजांना ठाऊक होता. शहाजी राजे आणि आमचं लग्न झालं. आमच्या मनात स्वातंत्र्याची पहाट होऊ लागली, आमच्या पोटामध्ये अंकुर वाढू लागला होता. आम्हाला विलक्षण डोहाळे लागले होते, आम्हाला मेवामिठाई किंवा सुगंधी सरबते हि नको होती..आमचे डोहाळेच वेगळे होते… आम्हाला हत्तीवर बसवेसे वाटत होते, डोंगर चढून किल्ले पाहवेसे वाटत होते, धनुष्यबाण, भाला, तलवार हाती घेऊन चिलखत चढवून लढाया करावेसे वाटत होते. आम्हाला एकूण 6 आपत्ये झाली. पहिले संभाजीराजे , नंतर 4 झाली आणि शेवटचे शिवाजीराजे.
शहाजीराजे हे विजापूरच्या दरबारात सरदार असल्याने तिथे आमचे जाणे-येणे असायचे. विजापूरमध्ये असताना बऱ्याच वेळेला करमणुकीसाठी दरबारात नाचगाण्याचे कार्यक्रम होत असायचे. अशाच एका कार्यक्रमाप्रसंगी संभाजी राजांनी शिवाजीराजांना विचारले, बाईचा नाच बघायला येता का ? पण शिवबा ठरले मातृभक्त...ते आमच्याकडे येऊन आम्हाला विचारू लागले, “आऊसाहेब, आपल्याइथे नाचणारी बाई आलीये तिचा नाच बघायला जाऊ का?” ते वाक्य ऐकून शिवबांचं लक्ष विचलत होत असल्याचं आम्हाला जाणवलं, आम्हाला खूप चीड आली, ...त्यांच्या जवळ जाऊन आम्ही एक लगाऊन दिली आणि बोललो, “बेटा, बाई नाचवायची नाही, वाचवायची असते.” शिवबा लहानपणापासूनच युद्धकलेत पारंगत झाले होते त्यांना आम्ही लहानपणापासून शिकवले….कोणत्याही जाती-धर्माचा द्वेष करायचा नाही आणि कुठल्याही जाती -धर्माच्या आहारीही जायच नाही. माता-भगिणींचा आदर करायचा आणि स्त्रियांना सम्मान द्यायचा, माणसांना माणसांसारखं वागवायच, त्यांची हेळसांड होऊ द्यायची नाही. स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य, इथे व्यक्ती न व्यक्ती स्वतंत्र आहे….इथे कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही, इथे अत्याचार चालणार नाही. आजही आम्हाला एक प्रसंग आठवतो, आम्ही राजवाड्यात बसलो असताना आमच्या कानावर एक खबर आली आणि आम्ही शिवबाला निरोप धाडला, जिथे आणि जसे असाल तिथुन टाकोटाक या, थाळा करायला बसला असाल तर हात धुवायला राजगडावर या. शिवबाने आम्हाला मुजरा केला आम्ही उठून पाठमोरे चालू लागलो…,आम्हाला याद केलंत, आऊसाहेब? हो,शिवबा. आम्हाला वचन द्या कि आम्ही देऊ ती कामगिरी तुम्ही बजावाल?
नक्कीच आऊसाहेब, तुम्ही सांगून तरी बघा…
शिवबा, आमच्या कानावर आलय कि, कोंडाण्याचा किल्लेदार उदयभान याने कमलकुमारी हिला पळवून आनून बंदी बनवुन ठेवले आहे. ताबडतोब जाऊन त्यांना सोडवून आणा. आणि शिवबांनी कमलकुमारी यांना सोडवून त्यांना सुखरूप त्यांच्या घरी आदराने सुपूर्त तर केलेच आणि कोंडाणा हि ताब्यात घेतला.
रयतेवर होणारे अत्याचार शिवबांना बघवत नव्हते, पण अफझल खानाला पराभूत करण्यासाठी पुरेसे सैन्यबळ उपलब्ध नव्हते, तेव्हा शिवबांनी वाईला जाऊन थेट अफझल खानावर चालून जाण्याची इच्छा आमच्या जवळ प्रकट केली. पण आम्ही जाणत होतो सबुरीचे बोट सोडू नये, भावनेस मनगट धरू देऊ नये, वाईत जायचे नाही, त्यालाच जावळीत बोलवावे. शिवबा, सावज टप्प्यात नसताना त्याला झेप घेण्यात कसे धजावताय, काय शिकलात या सह्याद्रीकडून?, मृगणितीचा अवलंब करावा. यावर शिवबा म्हणाले, “आईसाहेब, अफझल खान स्वतःहुन जावळीला येणार नाही.  शिवबा, वाईस तुम्ही नाही….आम्ही जाउ, एकटे. खानाच्या अहंकारास फुंकर घातली तर खान जावळीत येईल, हे खात्रीशीर. राजे,आम्ही येत आहोत असा त्यांना निरोप द्या.
अफझलखानाच्या भेटेप्रसंगी तुम्ही कमी आलात तर भीती बाळगू नका. तुमच्या पाठीमागे मी बाळशंभूस छत्रपती बनवून स्वराज्याची निर्मिती करीन.
संभाजी हे कनकगिरीच्या युद्धामध्ये अफझल खाना मुळे कपटाने मारले गेले.अखेर शिवबांनि वाघनखे खानाच्या पोटात घुसवून त्याचा कोथळा बाहेर काढला. शिवबांचा मोठ्या धाम-भूमीत राज्याभिषेक करण्यात आला आणि अशारितीने आम्हास समतावादी सत्ता प्रस्थापित करण्यास यश मिळालं. यापुढे मात्र आमचा कार्यकाळ संपत आल्याची आम्हाला जाणिव होऊ लागली, आमचं शरीर थकत चाललं होतं, आम्ही हळूहळू शिन होत होतो. शिवबांना स्वराज्याची सगळी सूत्र हातात देऊन आम्ही निर्धास्त झालो होतो. त्यांचं यश, त्यांची कीर्ती, शिवबांचा जय- जयकार पाहताना आम्ही समाधानी होतो. स्वराज्याच्या लाडक्या राजास पाहतच आम्ही आमचे कायमचेच डोळे मिटून घेतले.

जिजाऊ हि एक स्त्री होती....
स्वराज घडविणाऱ्या स्पुर्तीची ति एक मूर्ती होती...
शहाजी राजेंचे ति एक विर पत्नी होती ....
जाधव घराण्याची ति एक लाडकी लेक होती ...
भोसले घराण्याची ति एक आदर्श सून होती....
आपल्या पुत्रावर महान संस्कार करणारी ति एक महान माता होती...
स्त्री शक्ती चे प्रतिक असनाऱ्या त्या एक स्त्री उद्धारक माता होत्या...
जगातील प्रतेक स्त्री यांनी ज्यांचा आदर्श घ्यावा...
अशा त्या आदर्श माता होत्या ...

संदर्भ : 
https://moonsms.blogspot.in/2014/01/rajmata-jijabai-sms-text-message.html
https://www.youtube.com/watch?v=zsqU39RxotM
Raja ShivChatrapati book

Comments

Popular posts from this blog

डॉक्टर !!!

तो : काय रे डॉक्टर कधी येणार ? कंपाऊंडर : डॉक्टर साहेब काय आता येत नाहीत. तो : का रे ? वेळेत तर आलोय...माझ्या मुलीला फार ताप आलाय...नेहमी आम्ही याच डॉक्टरांकडे येतो... प्लीज त्यांना लवकरात लवकर कॉल करून बोलावून घे. कंपाऊंडर : अहो साहेब, नाई येणार ते… तो : असे कसे नाई येणार, तुला माहित नाही का मी कोण आहे ते… आत्ताच्या आत्ता फोन लावून बोलावून घे नाहीतर पार्टीतल्या लोकांना बोलावून तुझ्या त्या डॉक्टर च लायसेन्स रद्द करायला लावेन. जनतेची सेवा करायची करायची सोडून घरी आराम करत बसलाय काय? कंपाऊंडर : रागावू नका हो साहेब. मी ओळखलं तुम्हाला. पण परवाच एका विरोधी पक्षाच्या नेत्याचे वडील  अटॅक  येऊन गेले तर, कार्यकर्त्यांनी डॉक्टरांना मारहाण केली...लाथा- बुक्क्यांनी तुडवल आणि वर एकाने जाताना चाकू पण खुपसून गेला. आजच डॉक्टरांचं निधन झालं. बिचारे जाता - जाता पण….का डॉक्टर झालो म्हणत होते !!!

" सॉरी (Sorry)" ... Just a word

आज १ दिवस झाला तरी दोघे एकमेकांशी बोलत नव्हते. ३ वर्षांनी घरात पाळणा हलला होता. दोघेही बाळावर प्रेम खूप करायचे पण तेव्हापासून दोघांमध्ये काहीतरी बिनसलं होतं. एकाबाजूला त्याच्या कामाचा व्याप वाढलेला, जबाबदारी वाढलेली, तर दुसऱ्या बाजूला तिची बाळामुळे मानसिक आणि शारीरिक दमछाक होत होती. कुठला राग कुठे निघत होता, काहीच कळत नव्हतं. आधी कधीच अस झाल नव्हतं.  मुलासामोर मात्र ते दोघे नॉर्मल च होते. या वेळी दोघांनीही ठरवलेलं मी नाही सॉरी बोलणार, नेहमी मीच का सॉरी बोलु ? त्यांच्या २ वर्षाच्या बाळाला मात्र काहीच कळत नव्हत.  बाळ निरागस पणे खेळण्यात बिझी होतं. बाबा कामावरून आला. ती पाण्याने भरलेला ग्लास आणून समोर ठेवते आणि किचन मध्ये निघून जाते. तो थोडंसं पाणी पितो आणि ग्लास टेबलवर ठेवून फ्रेश व्हायला निघून जातो. ५ मिनिटांनी जोरात आवाज होतो म्हणून दोघेही बाहेर धावत येतात आणि पाहतात तर, त्यांचा मुलगा तो ग्लास उचलून आत ठेवायला जात असताना पाय अडकुन पडतो आणि त्याच्या हातातला पाण्याचा ग्लास खाली पडतो. मुलगा घाबरून उठतो आणि कान पकडून ..." सॉली " बोलत आईला जाऊन मिठी मारतो आणि आई - बाबा