Skip to main content

खिडकी भाग-१

खिडकी भाग-१

काळी 4.30 चा गजर झाला. इच्छा नसतानाही उठावं लागतं होतं. डोळे न उघडताच उजव्या हाताने, टेबलवर ठेवलेल्या मोबाईलचा गजर बंद केला आणि आरशात बघत बेसिन मधे तोंड धुतलं. रोजची धावपळ सूरु झाली. नाश्ता बनवा, दुपारचा जेवणाचा डब्बा, आणि तन्वी ला तयार करा.

तन्वी तिची मुलगी. आज तिचा शाळेचा पहिला दिवस होता. त्यामुळे तिची तयारी करुन, तिला शाळेत सोडून ऑफिसला जायचं होतं. घरातलं सगळं उरकून बेडरूम मध्ये जाऊन तन्वीला आवाज देऊ लागली, “तन्वी बाळा, उठ लवकर , आज शाळेत जायचंय...आणि आईला ऑफिस मधेपण जायचं आहे”

तन्वीने मात्र कुशी बद्दलण्या व्यतिरिक्त काहीच उत्तर दिलं नाही.

तिच्या अंगावरच ब्लॅंकेट बाजूला करत आईने पुन्हा तन्वी ला उठवायचा प्रयत्न केला...तशी तन्वी आईचा हात आपल्या दोन्ही हातात पकडून पुन्हा झोपू लागली.

आईने हळुवार पणे तन्वी च्या केसातून हात फिरवत म्हटलं, “ माझी तन्वी खुप हुशार आहे आणि ती आईच ऐकते. हो ना ?

म्हटल्याबरोबर डोळे चोळत तन्वी ने उत्तर दिलं… हो. आईने तन्वीच्या कपाळावर गोड पापा दिला आणि लगेच तिने आपली तयारी करायला सुरुवात केली. तोपर्यंत आईने तिची बॅग भरून ठेवली. दोघींची तयारी झाली आणि त्या निघाल्या. आई प्रत्येक थोड्या वेळाने घड्याळ बघत होती. आज पहिला दिवस म्हणून आई तिला शाळेच्या बसने न पाठवता स्वतःच सोडायला जाणार होती. दोन रिक्षा गेल्या नंतर तिसरी रिक्षा थांबली. दोघी रिक्षामध्ये बसल्या. रिक्षा चालु असताना अचानक तिला जुने दिवस आठवु लागले… कसे तिचेे बाबा तिला आणि तिच्या मोठ्या भावाला सायकल वरून शाळेत सोडायचे. तिच्यासाठी सायकलला त्यांनी स्वतःच्या पुढ्यात एक छोटीसी सीट बसवुन घेतली होती. बाबा सायकल चालवताना ती हँडल घट्ट पकडून बसायची, जणू काही ती स्वतःच सायकल चालवते. भावाला मात्र पाठी कॅरीजवर बसायला लागे. हे सगळं आठवत असताना तिच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. तन्वी मात्र तिची नवीन बार्बीडॉलवाली स्कूल बॅग बघण्यातच मग्न होती. रिक्षा थांबली, तशी ती भानावर आली आणि रिक्षामधुन उतरुन तिने तन्वी ला शाळेच्या गेटवर सोडलं. ती आत मध्ये जाईपर्यंत आई तिला पाठमोरी पाहत तिथेच उभी होती. जशी तन्वी वर्गात गेली तशी, ती धावत पळत बस स्टॉप वर जाऊन बसची वाट बघु लागली. ५ मिनीटांमध्ये बस आली. सगळ्या शाळा चालु झाल्यामुळे बसची गर्दी वाढली होती. २ स्टॉप नंतर अखेर तिला बसायला जागा मिळाली आणि तिला थोडं बरं वाटलं.

स्वाभिमानी, मनमिळाऊ, कष्टाळू अशी होती ती. कमरेपर्यंत केस, गोरा रंग, सरासरी उंची, आणि तिच्या गालावर पडणारी खळी हे तिच्या व्यक्तिमत्वाच एक आकर्षण होतं. बस स्टॉप पासून पाच मिनिटांवर चालत जाऊन १५ माळयाची एक मोठी बिल्डिंग होती त्यात ७ व्या माळ्यावर तीचं ऑफिस होतं. पटापट चालत जाऊन तिने लिफ्टच बटन दाबलं आणि दरवाजा बंद होता होता थांबला आणि तिने एक मोठा श्वास घेतला कारण लिफ्ट एकच चालु असल्यामुळे, एकदा लिफ्ट वरती गेली की १५ माळे फिरूनच खाली यायची त्यामुळे १५-20 मिनिटे थांबावं लागे.

लिफ्ट ७व्या मजल्यावर आली. तीच ऑफिस लिफ्टच्या समोरच होत. तिने आत प्रवेश केला आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग करत आपल्या जागेवर येऊन बसली. कंप्युटर चालु करत तिने ...ड्रॉवर मधून आपली डायरी उघडून आजच्या कामाची यादी पाहिली. तेवढ्यात तिच्या बाजूला बसणारी नंदिनी आली. नंदिनी तिची सहकारी आणि तिची चांगली मैत्रीणहि होती. नंदिनीच नवीनच लग्न झालं होत पण दोघी वयाने सारख्याच होत्या. नंदिनी बडबडी, खोडकर आणि आळशी होती पण स्वभावाला फार चांगली आणि मदतीला धावुन येणारी होती.

नंदिनी, “गुड मॉर्निंग… अनघा”

अनघा, “ गुड मॉर्निंग”

नंदिनी, “कधी आलीस?”

अनघा, “अगं आत्ताच… तन्वीची शाळा चालू झाली ना आजपासुन मग तिला सोडून तशीच आले.”

नंदिनी, “अगं मला अनामिका चा कॉल आलेला तिला लेट होणारे आज.”

अनघा, “का ग ?”

नंदिनी, “अरे ती त्या रोहन सोबत त्याच्या गाडीने येत होती तर टायर पंक्चर झालं आणि तसंही तिला काय फरक पडतो ग,  तिचा अर्धा दिवसाचा पगार कट झाला तरी…”

अनघा, “ते तर आहेच.”

दुपारी सगळे मिळून गप्पा मारत जेवतं. अनघा घरी कॉल करून तन्वीशी बोलून मगच जेवायला सुरुवात करायची मग गप्पा मारताना बरेच विषय निघत...घरापासून देशापर्यंतच्या चर्चा होत.

६ वाजले की मात्र अनघाला घरी पोहोचायची ओढ लागे.

तन्वी पण आईसारखीच हुशार होती. (तसंही म्हणतातच मुली जन्मतःच समंजस असतात....असो) शाळेतून आल्यावर स्वतःच सगळं आवरून आईने डब्बा भरून ठेवलेला खायची आणि मग थोडासा अभ्यास करून झोपून जायची. संध्याकाळी खेळायला जायची आणि अनघा आली की तिच्यासोबत घरी यायची आणि तिला मदत करायची. हा असाच दिनक्रम चालु असायचा.

अनघा सोसायटीच्या गेटवर दिसली तशी तन्वीने धावत जाऊन तिला मिठी मारली. दोघी घरी आल्या. जाता-जाता तन्वीची बडबड सुरु झाली.

तन्वी आईच्या ओढणीशी खेळत-खेळत, “आई, आज ना टीचर ने मला गुड म्हटलं”

अनघा आनंदात, “अरे वा”

त्यानंतर आज शाळेत काय-काय झालं, कोणी काय बोललं या सगळ्या गोष्टी ती अनघाला सांगे आणि अनघाही तीच ऐकून घेई. अनघा कितीही दमली असली तरी तन्वीच्या गप्पा ऐकून तिचा दिवसभरचा सगळा थकवा दुर होई. अनघा आणि तन्वी दोघीच होत्या एकमेकींना.

जेवुन झाल्यावर झोपताना अनघा तिला गोष्ट सांगे तन्वी झोपली कि अनघा एकटीच मग थोडावेळ खिडकी पाशी जाऊन बसे. तिला बाहेर दिसणाऱ्या रंगीबेरंगी लाईट्स पहात बसायला फार आवडे, असं रात्रीच्या शांततेत बसायला आणि धावत राहणारी मुंबई पहायला फार आवडे जणू ते पाहूनच तिला जगण्याची नवी उमेद मिळायची. आयुष्य जगायला एक अनोखी शक्ती घेऊनच ती झोपायची आणि नव्या उत्साहात आपला नवीन दिवस सुरु करायची. अनघाची आवडती जागा होती खिडकी, म्हणूनच तिने 8 व्या माळ्यावर आणि मोठी खिडकी असलेलं घर घेतलं होतं. जिथुन तिला दूर- दूर वर पसरलेले झगमगते लाईट्सचं बघता येत होतं.

तन्वी,“आई पुढच्या आठवड्यात शाळेत पालकांना बोलावलंय.”

अनघा,“ठीक आहे. मी येईन ना तुझ्या टीचर ला भेटायला.”

तन्वी रागवून,“नाही. सगळ्यांचे आई-बाबा दोघेही येणार आहेत. मलापण दोघेही हवेत”

अनघाच्या पोटात गोळा आला तरीही ती तन्वीला समजावु लागली, “बाळा, असा हट्ट करू नये. आणि अजून वेळ आहे ना….”

कसतरी समजावत विषय बदलत...तन्वी झोपली आणि अनघा खिडकीत येऊन बसली पण आज तन्वी ज्या गोष्टीचा हट्ट करत होती त्याच गोष्टीचा विचार तिच्या डोक्यात चालू होता. गोड बोलून अनघाने तिला झोपवलं खरं….पण तिला माहित होतं...पुन्हा तन्वी तिला बाबांबद्दल विचारेल हाच विचार करत करत दमलेल्या अनघाची झोप लागली…
( क्रमशः)

Comments

  1. पुढचा भाग नक्कीच वाचायला आवडेल.

    ReplyDelete
  2. पुढचा भाग नक्कीच वाचायला आवडेल.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मी जिजाऊ बोलतेय

पौष पौर्णिमा शके 1519 मध्ये म्हाळसा राणी आणि लखोजी राजे यांच्या घरी जन्माला आले तेव्हा दारा- दारांमध्ये रांगोळ्या काढल्या गेल्या, तोरण लावली गेली, हत्तीवरून साखर वाटण्यात आली.आमचं नाव जिजा ठेवण्यात आलं. जिजा म्हणजेच जय आणि विजय. आजूबाजूला सरदारांची वर्दळ, युद्धाचे डावपेच,सल्लामसलत, रयतेची गाऱ्हाणी...न्यायनिवाडे तर नित्याचेच हे असं होत आमचं बालपण. युद्धकला तर आम्ही शिकलोच होतो पण त्याचबरोबर 700 च्या वर आम्ही मुलींची 1 फौज तयार केली होती. पहाटे- पहाटे जेव्हा आम्ही घोड्यावरून रपेट करायला जायचो तेव्हा गावकुसातल्या काही बायका कौतुक करायच्या आणि काही नाकही मुरडायच्या, काही म्हणायच्या .. या पोरींचं कस होईल पण आम्ही निश्चय केलेला, स्वतः सोबत ...इतरांचं रक्षण करता आलं पाहिजे. म्हाळसा राणीच्या इच्छे खातर आम्ही 6 भाषा शिकलो,...मराठी, संस्कृत, उर्दू, अरबी, फारसी, कन्नड. रामायण- महाभारताबरोबरच, नामदेवांची गाथा, कबिराचे दोहे, कुराण, बायबल आम्ही वाचलं आणि समजूनही घेतलं आणि आमच्या मनात प्रश्न निर्माण झाला,...धर्म म्हणजे काय?..धर्म म्हणजे मानव सकल कल्याण कि कर्म कांड?, आम्ही तलवार चालवतो कुणासाठी?, प

डॉक्टर !!!

तो : काय रे डॉक्टर कधी येणार ? कंपाऊंडर : डॉक्टर साहेब काय आता येत नाहीत. तो : का रे ? वेळेत तर आलोय...माझ्या मुलीला फार ताप आलाय...नेहमी आम्ही याच डॉक्टरांकडे येतो... प्लीज त्यांना लवकरात लवकर कॉल करून बोलावून घे. कंपाऊंडर : अहो साहेब, नाई येणार ते… तो : असे कसे नाई येणार, तुला माहित नाही का मी कोण आहे ते… आत्ताच्या आत्ता फोन लावून बोलावून घे नाहीतर पार्टीतल्या लोकांना बोलावून तुझ्या त्या डॉक्टर च लायसेन्स रद्द करायला लावेन. जनतेची सेवा करायची करायची सोडून घरी आराम करत बसलाय काय? कंपाऊंडर : रागावू नका हो साहेब. मी ओळखलं तुम्हाला. पण परवाच एका विरोधी पक्षाच्या नेत्याचे वडील  अटॅक  येऊन गेले तर, कार्यकर्त्यांनी डॉक्टरांना मारहाण केली...लाथा- बुक्क्यांनी तुडवल आणि वर एकाने जाताना चाकू पण खुपसून गेला. आजच डॉक्टरांचं निधन झालं. बिचारे जाता - जाता पण….का डॉक्टर झालो म्हणत होते !!!

" सॉरी (Sorry)" ... Just a word

आज १ दिवस झाला तरी दोघे एकमेकांशी बोलत नव्हते. ३ वर्षांनी घरात पाळणा हलला होता. दोघेही बाळावर प्रेम खूप करायचे पण तेव्हापासून दोघांमध्ये काहीतरी बिनसलं होतं. एकाबाजूला त्याच्या कामाचा व्याप वाढलेला, जबाबदारी वाढलेली, तर दुसऱ्या बाजूला तिची बाळामुळे मानसिक आणि शारीरिक दमछाक होत होती. कुठला राग कुठे निघत होता, काहीच कळत नव्हतं. आधी कधीच अस झाल नव्हतं.  मुलासामोर मात्र ते दोघे नॉर्मल च होते. या वेळी दोघांनीही ठरवलेलं मी नाही सॉरी बोलणार, नेहमी मीच का सॉरी बोलु ? त्यांच्या २ वर्षाच्या बाळाला मात्र काहीच कळत नव्हत.  बाळ निरागस पणे खेळण्यात बिझी होतं. बाबा कामावरून आला. ती पाण्याने भरलेला ग्लास आणून समोर ठेवते आणि किचन मध्ये निघून जाते. तो थोडंसं पाणी पितो आणि ग्लास टेबलवर ठेवून फ्रेश व्हायला निघून जातो. ५ मिनिटांनी जोरात आवाज होतो म्हणून दोघेही बाहेर धावत येतात आणि पाहतात तर, त्यांचा मुलगा तो ग्लास उचलून आत ठेवायला जात असताना पाय अडकुन पडतो आणि त्याच्या हातातला पाण्याचा ग्लास खाली पडतो. मुलगा घाबरून उठतो आणि कान पकडून ..." सॉली " बोलत आईला जाऊन मिठी मारतो आणि आई - बाबा