Skip to main content

खिडकी भाग- ३

नघा, नंदिनी आणि अर्णव असा तिघांचा छान ग्रुप झालेला. अर्णव पण बोलका असल्यामुळे अनघाही त्याच्याशी बोलु लागली. अर्णवला ऑफिस जॉईन करून 6 महिने झालेले. अनघाचा स्वभाव त्याला आवडू लागला होता, हळूहळू तिच्याबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर त्याच्या मनात तयार होत होता. अनघा कधी आली नाही की त्याच मन कासावीस होई., कामात नीट लक्ष लागत नसे. नंदिनी प्रमाणे त्यानेही बरंच काही ऐकलं होतं तिच्याबद्दल पण तो लक्ष देत नसे.
एकदा तन्वी आजारी पडली आणि अनघा ऑफिसला आली नाही. लंचब्रेक झाला. त्याला नंदिनीला अनघाबद्दल बरच काही विचारायचं होतं आणि आज ती संधी त्याला मिळाली होती.
अर्णव : अनघा का नाही आली ग आज ?
नंदिनी : तिची मुलगी आजारी आहे रे.
अर्णव : ओह..
अर्णव : नंदिनी, आपण दोघेही सगळं सांगतो तिला आपल्या फॅमिलीबदद्दल पण तीची turn आली की मात्र ती नेहमी विषय बदलते.
नंदिनी : हो, ती तशीच आहे रे. थोडी वेगळी आहे पण मनाने चांगली आहे.
अर्णव : तुला माहितीये नंदिनी ऑफिस मध्ये तिच्याबद्दल काहीही बोललं जातंय...म्हणजे मी त्यावर विश्वास ठेवत नाही पण तरीही खरं काय ते कळायलाच हवं.
नंदिनी : अरे, एवढं का tension घेतोस...हे बघ अनघा एक व्यक्ती म्हणून खूप चांगली आहे आणि कधीच कोणाचं वाईट बोललेली आजपर्यंत तरी मी ऐकलेलं नाही. आणि लोकांचं म्हणत असशील तर मला फरक पडत नाही, कारण लोकांना दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावण्या व्यतिरिक्त काहीच येत नाही. अरे, हिम्मत असेल तर तोंडावर बोला म्हणावं.
अर्णव (घाबरून) : शांत हो जाओ माता, शांत…
नंदिनी ( हसत ) : ए, काहीही काय…
अर्णव : चला निदान शांत तरी झालीस, अग घाबरलो ना मी. बरं, ऐक ना…
नंदिनी : बोल
अर्णव : तुला खरंच काही माहीत नाही अनघाबद्दल ?
नंदिनी : ( संशयित नजरेने) तुला बरीच जाणून घ्यायची इच्छा दिसतेय…
अर्णव (गडबडून) : अग आपली मैत्रीण आहे ती तिच्याबद्दल माहिती असायला हवी.
नंदिनी : बरं. पण मला एवढंच माहितीये की तिला 1 मुलगी आहे आणि तीच लग्न लवकर झालं असल्यामुळे तीच वय थोडं लहान दिसतं.
अर्णव : आणि तिचा नवरा?
नंदिनी : कोणी बोलतं तिचा नवरा मेला, कोणी बोलतं तीच पळून आली, कोणी बोलतं तीच लग्नच झालेलं नाही...तिला मी बऱ्याच वेळा विचारायचा प्रयत्न केला पण ती मला एवढंच म्हणाली की तिला कोण- काय बोलत याच्याशी फरक पडत नाही आणि उगाच ती दुसर्यांना तिची दुःखद कहाणी सांगणार आणि मग लोक त्यावर दिलगिरी व्यक्त करणार, सांत्वन करणार तर कोणी तिलाच दोषी ठरवणार...त्यापेक्षा ते न सांगितलेलंच बरं. माझा भुतकाळ, भुतकाळचं राहू दे...असं ती म्हणाली. त्यादिवसानंतर मी कधीच तिला पुन्हा तो प्रश्न विचारला नाही.
अर्णव : मग दुपारी ती रोज कोणासोबत बोलते?
नंदिनी : तिच्या मुलीशी…
ब्रेक संपला होता आता दोघेही कामाला लागले. पण अर्णव...
अर्णवला अनघाबद्दल जाणून घ्यायच होत त्याशिवाय त्याला आता चैन पडत नव्हतं. ऑफिस सुटल्यावर तो थेट अनघाच्या घरी निघाला. त्याने तिचा घरचा पत्ता ऑफिस मधुन मिळवला होता.
अर्णव अनघाच्या बिल्डींग समोर उभा होता त्याच्या डोक्यात असंख्य प्रश्न घोंघावत होते आणि मनात भीती दाटून आली होती. स्वतःलाच समजावत तो पुढे चालत होता… कधीतरी बोलायचंच आहे तर आज का नाही? लिफ्टमध्ये जाऊन त्याने 8 व्या माळ्याचं बटन दाबलं. तो लिफ्टमधून बाहेर आला..शेजारच्या घरावरची नेमप्लेट पाहिली, त्यावर फक्त “ अनघा” एवढंच लिहिलं होतं. त्याने डोळे बंद करून हृदयावर हात ठेवला आणि स्वतःशीच पुटपुटत बेल वाजवली. अनघाने दार उघडलं आणि आश्चर्याने बघुन बोलू लागली.
अनघा : तु ? तू इथे कसा ?
अर्णव मात्र काही सेकंद तिच्याकडे पहातच बसला.
अनघा : अर्णव…?
अर्णव : अ…. अग हो. इथे जवळच आलेलो तर म्हटलं तुला भेटून जावं… i mean तन्वीला
अनघा (अवघडून) : अच्छा
अर्णव : अग आत तरी बोलवणारेस की इथेच प्रश्न विचारत बसणारेस ?
अनघा : अ.. हो. ये ना… आत ये
तो आत येऊन बसला आणि ती पाणी घेऊन आली.
अर्णव (पाणी पीत) : कशी आहे तन्वी ?
अनघा : आता ठीक आहे but झोपलीये आत. Viral fever आलेला.
अर्णव : आणि तु कशी आहेस ?
अनघा (हसत) : मी ? मला काय झालंय. मी ठीक आहे. तु इथे कोणाकडे आलेलास ?
अर्णव : अ… मी actually , माझ्या बाबांचे मित्र राहतात त्यांच्या…
अनघा : (त्याच बोलणं मधेच तोडत) हे बघ अर्णव, तु direct ऑफिस मधून आला आहेस. मला माहितीये...
अर्णव : अनघा, sorry (मोठा श्वास घेऊन) मला माहितीये तुला तुझा भुतकाळ आठवून त्रास होतो पण मला तो भुतकाळ जाणुन घ्यायचाय…
अनघा : पण कशाला ?
अर्णव : ऑफिस मधले लोक तुझ्याबद्दल काहीही बोलतात , तु का उत्तर नाही देत त्यांना ?
अनघा : का देऊ ? कोण आहेत ते ?
अर्णव : तस नाही ग पण… मला माहितीये तु काही चुकीचं करू शकत नाहीस…
अनघा : का ?
अर्णव : कारण मला विश्वास आहे तुझ्यावर
अनघा : कसा ?
अर्णव : (नकळतपणे) कारण तु मला आवडते आणि कोणीही तुला काहीही बोललेलं मला आवडणार नाही…
अनघा : ( आश्चर्याने त्याच्याकडे पाहते आणि ओरडते) अर्णव..
अर्णव : तुला राग आला असेल तर माफ कर. मला नाही माहीत तुझ्या भुतकाळाबद्दल पण खरच...खरंच मला तु आवडते.
अनघा : (रागाने) अर्णव, वेडा आहेस का तु ? माझं लग्न झालंय आणि मला 1 मुलगी ही आहे.
अर्णव : मग कुठे आहे तुझा नवरा ?
अनघा : (हळूच डोळ्यातलं पाणी पुसत) हे बघ अर्णव , तु जा इथुन… मला नाही बोलायचंय तुझ्याशी
अर्णव : अनघा, हे बघ संपुर्ण विचार करूनच मी आज इथे आलोय. Please अनघा आज बोल… मी पुन्हा कधीच तुला याबद्दल काहीच विचारणार नाही आणि काही बोलणार नाही.
अनघा : ठीक आहे.
अनघा आतमध्ये जाऊन तन्वी झोपल्याची खात्री करते आणि बाहेर येऊन अर्णवशी बोलु लागते.
अनघा : मी शाळेत होते तेव्हा माझी आई देवाघरी गेली. वडिलांनी मला आणि माझ्या भावाला शिकवलं. मला एक स्थळ सांगुन आलं. 20 वर्षांची होते तेव्हा माझं लग्न करून दिलं माझ्या वडिलांनी. घरातले सगळे शिकले- सवरलेले होते. मुलगा UK मध्ये होता कामाला. मला पुढे शिकायचं होतं पण बाबांची खुशी बघुन मी लग्नाला तयार झाले. लग्न थाटामाटात पार पडलं. पहिले काही दिवस फार छान वाटले. माझा नवरा लग्नानंतर 1 महिन्याने UK ला गेला,आमच्यामध्ये तेवढा फारसा काही संवादच झाला नाही, मला फार वाईट वाटत होते पण काय करणार, त्याच्या कामासाठी तर त्याला जावंच लागणार होतं आणि 3 महिन्यांनी तो परत आला. मी खुप खुश झाले पण तेव्हाही तो माझ्याशी तेवढं काही नीट वागला नाही, आणि 15 दिवसांनी तो गेला ते परत आलाच नाही. माझ्याकडे त्याचा नंबर होता. मी कॉल केला की तो थोडावेळ बोलून ...काम आहे बोलून कॉल कट करायचा. स्वतःलाच समजावायची आणि घरच्या कामात busy व्हायची. पण तो येऊन गेला आणि पुढच्या महिन्यातच कळालं की i was preganant. हे कळल्यावर घरातले सगळे खुश झाले. मी त्याला कॉल करून सांगितलं पण त्याच्या बोलण्यातून मला तो आनंद दिसुन आला नाही पुन्हा मनाला समजावलं. मला 7 वा महिना लागला तरी त्याने कधीच मला कॉल करून एकदा विचारलंही नाही.
( स्वतःचे डोळे पुसत) अर्णव, अरे आई नव्हती मला आणि बाबांना tension नको म्हणून त्यांनाही मी कधी कळुन दिलं नाही. खुप वेदना व्हायच्या रे...हळूहळू त्याच्या घरचेही काहीस तुटक वागायचे. बाळंतपणासाठी घरी गेले. तन्वी झाली आणि लग्नानंतरचा तो पहिला आनंदाचा क्षण मी अनुभवला. तन्वी आणि मी हॉस्पिटलमध्ये होते पण सासरकडून कोणी पहायला किंवा भेटायला सुद्धा नाही आले. मी नवऱ्याला कॉल करायचा प्रयत्न केला पण त्याने स्वतःचा नंबरच बदलला. तन्वी 2 महिन्यांची झाली तेव्हा मीच स्वतःहून सासरी घेऊन गेले तिला तर तिथे मला कळालं....की माझ्या नवऱ्याने UK मध्येच लग्न केलंय आणि तो परत येणार नाही. ते ऐकल्यावर मात्र माझ्या पायाखालची जमीनच सरकली. त्या लोकांचे पुढचे शब्द म्हणजे कोणीतरी माझ्यावर चाकूचे वार केल्यासारखे वाटत होते, ते ऐकून मी सुन्न पडले होते आता काय करायचं...कुठे जायचं आणि त्यात तन्वी माझ्या हातात...मला काहीच सुचत नव्हते. समोरचे शब्द कानात उकळतं तेल ओतल्यासारखे वाटत होते
सासु : तुझ्यामुळे माझा मुलगा मला सोडून गेला. कशाला आली आहेस इथे ?
सासरे : आलीस तशीच निघून जा आणि हे बाळ कोणाचं आहे आम्हाला माहीत नाही...पुन्हा तोंड दाखवू नकोस. नवरा तर गेला तुझा आता तुम्हाला दोघींना आम्ही का पोसु ?
माझे तोंड बंद होते आणि डोळ्यातले अश्रू मात्र थांबत नव्हते.काहीच सुचत नव्हते पुढं काय करावं. जवळच्याच एका देवळात जाऊन बराच वेळ देवाकडे पाहत त्याला एकच प्रश्न विचारत राहिले...मीच का ????
या सगळ्या गोष्टीला त्याच्या घरचे मलाच जवाबदार समजत होते, त्यात आता तन्वी ची जबाबदारी. मधेच जीव द्यायचा विचार आला पण त्याचवेळेस स्वतःलाच कानाखाली मारून शांत केलं आणि तन्वीच्या निरागस चेहऱ्याकडे पाहिलं. कसातरी धीर एकवटून परत बाबांकडे आले. काही महिन्यांपूर्वी भावाचं लग्न झालेलं. बाळंतपणासाठी आलेली मी तिथुन हलेनाशी झाली आणि त्यांच्या Privacy चा बट्याबोळ झाला. माझ्या घरी जाण्याच्या दिवशी माझ्या वहिनीच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेनासा झालेला. मी पुन्हा घरी आले आणि ती मात्र सुतकी चेहऱ्याने माझ्याकडे पाहू लागली.
ताई तुम्ही परत ?
मी तन्वीला घेऊन बेडरूममध्ये गेली आणि दरवाजा बंद करून खूप रडले. बाबांना जेव्हा हे सगळं कळालं तेव्हा त्यांना ही रडू आवरले नाही. माझी माफी मागू लागले ते.
बाबा : माफ कर अनघा मला, कमी वयात लग्न करून दिल तुझं. वाटलं होतं, माणसं चांगली आहेत...सुखी होशील. तुला शिकण्याची इच्छा होती पण मीच ...मीच शिकू नाही दिलं. माफ कर पोरी.
माझ्या मात्र तोंडातून एक शब्द निघाला नाही. तो पूर्ण दिवस मी कोणाशी काहीच बोलले नाही. बाबांनी बऱ्याच वेळा माझ्या सासरी जाऊन माझ्या नवऱ्याचा नंबर आणि त्याचा UK चा address विचारायचा प्रयत्न केला पण कोणी काही मदत नाही केली. रोज घरातली कामात मदत करायची पण कमावणारा 1 आणि खाणारी 4 तोंड त्यामुळे दादा- वहिनी ची चिडचिड वाढत होती. बाबांची तब्येत खराब होऊन ते सुद्धा आम्हाला सोडून गेले. त्यानंतर छोटं-मोठं काम करत, Computer चा कोर्स केला. दादा आणि वहिनीच बोलणं कानावर पडलं आणि मी भाड्याने 1 रूम पाहीली, तोपर्यंत तन्वी 1 वर्षाची झालेली. तिला पाळणा घरात ठेवून मी कमवु लागली. जिथे- जिथे गेले, लोकं बऱ्याच गोष्टी बोलायचे माझ्याबद्दल पण मी कधीच लक्ष नाही दिलं. दिवस कामात जायचा… नंतर घरी तन्वी... पण ती झोपली की मात्र मी मग खिडकीत एकटीच बसून मी स्वतःला उद्यासाठी प्रोत्साहन द्यायची. कारण मला जगायचं होत माझ्यासाठी आणि माझ्या तन्वीसाठी...कारण तिची बिचारीची या सगळ्यात काहीच चुक नव्हती त्यानंतर आजपर्यंत मला, ना माझ्या सासरकडून कोणी कधी भेटलं आणि ना माहेरकडून. तन्वीच माझं सर्वस्व आहे आणि आम्ही दोघीही एकमेकांसोबत खूप खुश आहोत.
अर्णव : and ur husband ?
अनघा : अरे लग्नाच्या 4 महिन्यात तो मला सोडून गेला तो परत कधी आलाच नाही आणि please...Don't call him my husband. तो जिवंत आहे की मेला ...हे ही मला माहित नाही आणि जाणून घ्यायची इच्छा ही नाही.
अर्णव : पण तन्वीला जर वडील हवे असतील तर ?
अनघा : नाही, मला नाही वाटत तिला तस काही वाटत असेल…
अर्णव : हे तु नाही ठरवु शकत अनघा…
अनघा : हे बघ अर्णव, तुला माझ्याबद्दल जाणून घ्यायचं होतं, ते मी तुला सांगितलं आता तु इथून गेलास तरी चालेल.
अर्णव : पण अनघा तू मला खरंच आवडतेस आणि हे सगळं ऐकल्यावर तर तुझ्याबद्दल आदर वाटु लागला आहे मला... एवढ्या वाईट परिस्थितीतही तु किती धैर्याने वागलीस. हे बघ, सगळेच पुरुष सारखे नसतात आणि जस तू म्हटलीस, मलाही नाही फरक पडत...लोकं काय म्हणतात किंवा त्यांना काय वाटतं… मला नाही फरक पडत...मला तुझ्याशी लग्न करायचंय अनघा… Will u marry me ?
अनघा : हे बघ अर्णव, हे बोलणं जितकं सोप्प आहे तितकंच तस वागणं खुप कठीण आहे आणि या रस्त्यावर आता मी खुप पुढे निघुन आलीये. त्यामुळे तु हा विचार सोडून दे.
अर्णव : नाही अनघा, मला असं नाही वाटत. रस्ता कितीही कठीण असला तरी आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत चालताना अडथळयांची फिकीर वाटत नाही. तुला आणि तन्वीला मी accept करायला तयार आहे.
अनघा : आणि तुझ्या घरचे ?
अर्णव : (अडखळत) अ...मी बोलेन त्यांच्याशी… ऐकतील ते माझं. थोडे दिवस हवं तर तन्वीला आपण बोर्डिंग ला टाकु...
अनघा : (मनाशीच विचार करून थोडंस हसते) अर्णव, आजपर्यंत मी माझं आयुष्य दुसऱ्यांसाठी जगले. लहानपणी आई म्हणेल तस वागले, नंतर वडील म्हणतील तस वागले, ते म्हटले म्हणून शिक्षणसोडून लग्न केलं कारण त्यांच्याकडे माझ्या शिक्षणासाठी पैसे नव्हते., नंतर कळत असूनही त्या सासरी मी त्या लोकांसोबत राहिले कारण… घरी आले तर लोकं काय म्हणतील… (स्वतःचे डोळे पुसत) कंटाळा आलाय रे मला या सगळ्याचा...का मीच विचार करू या सगळ्यांचा… मला स्वतःला जगण्याचा अधिकार नाही का ?, स्वतःचे निर्णय मी का नाही घेऊ शकत ? मला आता माझ्यासाठी जगायचंय, मला हवं तसं मी जगणार...जबरदस्ती बांधलेली नाती नको आहेत मला. हे बघ अर्णव, तुला माझ्यावर दया येत असेल, सहानुभूती वाटत असेल पण त्याचा अर्थ प्रेम नाही. आज तुला ते चांगलं वाटेलही पण नंतर तुला स्वतःलाच आश्चर्य वाटेल या निर्णयावर. (थोडसं गंभीरपणे) मला वाटतं फार उशीर झालाय...आता तु गेलं पाहिजेस…
(तेवढ्यात आतून तन्वी अनघाला हाक मारत येते)
तन्वी : आई…
( तन्वी अनघाला मिठी मारते आणि अर्णव तिथुन निघून जातो. अनघा तन्वी ला घेऊन खिडकीपाशी येते.)
खिडकी...दुसऱ्यांना पाहताना स्वतःला आयुष्य जगण्याची एक प्रेरणा…सांताक्लॉजच्या बॅगेप्रमाणे हवी असलेली स्वप्नांची शिदोरी.
समाप्त.

Comments

Popular posts from this blog

मी जिजाऊ बोलतेय

पौष पौर्णिमा शके 1519 मध्ये म्हाळसा राणी आणि लखोजी राजे यांच्या घरी जन्माला आले तेव्हा दारा- दारांमध्ये रांगोळ्या काढल्या गेल्या, तोरण लावली गेली, हत्तीवरून साखर वाटण्यात आली.आमचं नाव जिजा ठेवण्यात आलं. जिजा म्हणजेच जय आणि विजय. आजूबाजूला सरदारांची वर्दळ, युद्धाचे डावपेच,सल्लामसलत, रयतेची गाऱ्हाणी...न्यायनिवाडे तर नित्याचेच हे असं होत आमचं बालपण. युद्धकला तर आम्ही शिकलोच होतो पण त्याचबरोबर 700 च्या वर आम्ही मुलींची 1 फौज तयार केली होती. पहाटे- पहाटे जेव्हा आम्ही घोड्यावरून रपेट करायला जायचो तेव्हा गावकुसातल्या काही बायका कौतुक करायच्या आणि काही नाकही मुरडायच्या, काही म्हणायच्या .. या पोरींचं कस होईल पण आम्ही निश्चय केलेला, स्वतः सोबत ...इतरांचं रक्षण करता आलं पाहिजे. म्हाळसा राणीच्या इच्छे खातर आम्ही 6 भाषा शिकलो,...मराठी, संस्कृत, उर्दू, अरबी, फारसी, कन्नड. रामायण- महाभारताबरोबरच, नामदेवांची गाथा, कबिराचे दोहे, कुराण, बायबल आम्ही वाचलं आणि समजूनही घेतलं आणि आमच्या मनात प्रश्न निर्माण झाला,...धर्म म्हणजे काय?..धर्म म्हणजे मानव सकल कल्याण कि कर्म कांड?, आम्ही तलवार चालवतो कुणासाठी?, प

डॉक्टर !!!

तो : काय रे डॉक्टर कधी येणार ? कंपाऊंडर : डॉक्टर साहेब काय आता येत नाहीत. तो : का रे ? वेळेत तर आलोय...माझ्या मुलीला फार ताप आलाय...नेहमी आम्ही याच डॉक्टरांकडे येतो... प्लीज त्यांना लवकरात लवकर कॉल करून बोलावून घे. कंपाऊंडर : अहो साहेब, नाई येणार ते… तो : असे कसे नाई येणार, तुला माहित नाही का मी कोण आहे ते… आत्ताच्या आत्ता फोन लावून बोलावून घे नाहीतर पार्टीतल्या लोकांना बोलावून तुझ्या त्या डॉक्टर च लायसेन्स रद्द करायला लावेन. जनतेची सेवा करायची करायची सोडून घरी आराम करत बसलाय काय? कंपाऊंडर : रागावू नका हो साहेब. मी ओळखलं तुम्हाला. पण परवाच एका विरोधी पक्षाच्या नेत्याचे वडील  अटॅक  येऊन गेले तर, कार्यकर्त्यांनी डॉक्टरांना मारहाण केली...लाथा- बुक्क्यांनी तुडवल आणि वर एकाने जाताना चाकू पण खुपसून गेला. आजच डॉक्टरांचं निधन झालं. बिचारे जाता - जाता पण….का डॉक्टर झालो म्हणत होते !!!

" सॉरी (Sorry)" ... Just a word

आज १ दिवस झाला तरी दोघे एकमेकांशी बोलत नव्हते. ३ वर्षांनी घरात पाळणा हलला होता. दोघेही बाळावर प्रेम खूप करायचे पण तेव्हापासून दोघांमध्ये काहीतरी बिनसलं होतं. एकाबाजूला त्याच्या कामाचा व्याप वाढलेला, जबाबदारी वाढलेली, तर दुसऱ्या बाजूला तिची बाळामुळे मानसिक आणि शारीरिक दमछाक होत होती. कुठला राग कुठे निघत होता, काहीच कळत नव्हतं. आधी कधीच अस झाल नव्हतं.  मुलासामोर मात्र ते दोघे नॉर्मल च होते. या वेळी दोघांनीही ठरवलेलं मी नाही सॉरी बोलणार, नेहमी मीच का सॉरी बोलु ? त्यांच्या २ वर्षाच्या बाळाला मात्र काहीच कळत नव्हत.  बाळ निरागस पणे खेळण्यात बिझी होतं. बाबा कामावरून आला. ती पाण्याने भरलेला ग्लास आणून समोर ठेवते आणि किचन मध्ये निघून जाते. तो थोडंसं पाणी पितो आणि ग्लास टेबलवर ठेवून फ्रेश व्हायला निघून जातो. ५ मिनिटांनी जोरात आवाज होतो म्हणून दोघेही बाहेर धावत येतात आणि पाहतात तर, त्यांचा मुलगा तो ग्लास उचलून आत ठेवायला जात असताना पाय अडकुन पडतो आणि त्याच्या हातातला पाण्याचा ग्लास खाली पडतो. मुलगा घाबरून उठतो आणि कान पकडून ..." सॉली " बोलत आईला जाऊन मिठी मारतो आणि आई - बाबा