निकीताने फेसबुक चालू केल आणि निखिलने पाठवलेली तिसरी फ्रेंड रिक्वेस्ट तिने डिलीट केली. तिने आज मनाशी निर्णय घेतला आणि निखीलशी जे काय आहे ते स्पष्टपणे बोलायचं ठरवलं त्याप्रमाणे तिने निखिलला भेटायला बोलावलं.
सकाळपासूनच त्याच्याशी काय बोलायचं ...त्याला काय विचारायचं हे तिने ठरवून ठेवलं होतं. निकिताला भेटायला जायचं म्हणून निखिल खुश होता पण निकिताने काही महत्वाचं बोलायचंय असं म्हटल्यावर मात्र निखिलच्या काळजाचा ठोका चुकला होता. त्याच्या सोबत जे आधी झालं होतं त्यामधून तो कसातरी सावरला होता आणि आता पुन्हा निकिताने असं बोलावलं तेव्हा त्याला परत भीती वाटू लागली.
ते दोघेही कॉफी शॉपमधे भेटले. निखिल आधीपासूनच तिथे उभा राहून तिची वाट पहात होता. निकिता आली, थोडी गंभीर दिसत होती ती. निखिलने तिच्याकडे हसून पाहिलं मग तिनेही ओठ ताणून थोडस हसल्यासारखं केलं.
निखिलने घाबरत का होईना पण विषयाला हात घातला, “बोला… काय महत्वाचं बोलायचंय तुम्हाला ?”
निकिता, “मला तुम्हाला काहीतरी विचारायचं होत..”
निखिल तिच्याकडे पहात, “विचारा”
निकिता, “म्हणजे….मला भीती वाटतेय”
निखिल दचकून एकडे तिकडे बघत, “ कोणाची ?”
निकिता, “तस नाही हो”
निखिलला काही कळतच नव्हतं. निकीताने मोठ्ठा श्वास घेतला. आणि बोलू लागली.
निकिता, “तुम्ही मला सांगितलंत कि तुमचं एका मुलीशी लग्न ठरलं होतं, तुम्ही तिला बऱ्याच वेळा भेटलात आणि फिरलात तिच्यासोबत. तुम्हाला ती फार आवडत होती…”
निखिलला आता अंदाज येऊ लागला होता तिच्या मनाचा. त्याने मानेने होकार दिला.
निकिता, “मी खरंच तुम्हाला आवडते ?, तुम्ही मला पहिल्याच दिवशी कसा होकार दिला...फक्त मी दिसायला आवडले म्हणून ? अजूनही तुम्ही त्या मुलीशी संपर्कात आहात का ?, आणि तिच्यावरच्या रागामुळे तर तुम्ही मला हो नाही ना म्हटलात?” निकिता ने प्रश्न थांबवले आणि त्याच्याकडे पाहू लागली.
तिचे प्रश्न संपताच त्याने तिला उत्तर द्यायला सुरुवात केली , “मी त्या मुलीशी त्याच दिवशी संबंध तोडला होता ज्या दिवशी ती मला नाही म्हटली. आता मला तीच तोंड बघायला देखील आवडणार नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या बद्दल मी आधीच जमेल तेवढी माहिती काढली होती. तुमच्याशी बोलून मला तुमचा स्वभाव कळला आणि मला तुमचा रंग, तुमची उंची किंवा तुमचं शिक्षण याच्याशी फरक पडत नाही कारण मला हवी तशी जोडीदार भेटणं महत्वाचं आहे आणि ती जोडीदार मी तुमच्यात पाहिली. मला फरक पडत नव्हता माझ्या आई- वडिलांना काय वाटत कारण संसार मला करायचा होता आणि त्यासाठी माझ्या इच्छा, अपेक्षा महत्वाच्या होत्या आणि तुमच्या मन-मिळावू स्वभावामुळे माझ्या आई-वडिलांना हि तुम्ही आवडणार हे मला माहित होत म्हणून मी त्याचवेळेस तुम्हाला माझा होकार कळवला. ”
निखिल बोलत होता आणि निकिता शांतपणे त्याच सगळं ऐकत होती. त्याच बोलणं संपलं होत आणि ती तशीच त्याच्याकडे एकटक बघत होती हे तिच्या लक्षात आलं तस तिने आपली नजर खाली केली.
निखिल, “हे बघा, अजून तुम्हाला काहीही विचारायच असेल तर विचारा कारण जर काही प्रॉब्लेम असेल तर ते आत्ताच कळालं तर बर होईल.”
निकिता, “माफ करा जर तुम्हाला राग आला असेल तर…”
निखिल, “नाही. मला खूप बर वाटल निदान तुमच्या मनात जे प्रश्न होते माझ्याबद्दल ते तुम्ही मला विचारले. मला या नात्यात काहीही गैरसमज नको आहे. पण…. मला राग येतोय…”
निकिता घाबरून, “ का ?”
निखिल, “घाबरू नका, म्हणजे तुम्ही मला तु म्हटलेलं जास्त आवडेल.”
निकिता, “तुम्हीपण मला… सॉरी, तु पण मला अरे-तुरे केलेलं आवडेल.” आणि दोघांनीही एकमेकांकडे हसत पाहिलं.
निकिता ने घरी जाऊन आईला होकार कळवला आणि आईचा आनंद गगनात मावेनासा झाला. संध्याकाळी बाबा घरी आले आणि आई त्यांना देशमुखांच्या घरी होकार कळवायला सांगत होती आणि बेडरूममध्ये बसून निकीता मात्र काहीतरी आठवून एकटीच हसत होती, सारखी स्वतःलाच आरशात पहात होती जणू स्वतामध्येच आज तिला काहीतरी वेगळं दिसत होतं. तिच्या आजूबाजूला रंगीबेरंगी फुलपाखरे उडत होती. आज पहिल्यांदा प्रेमात पडल्याचा आनंद ती अनुभवत होती. तिने फेकबुक चालू केलं आणि समोर निखिलची चौथी फ्रेंड रिक्वेस्ट तिने एक्सेप्ट केली आणि त्यांच्या गप्पा सुरु झाल्या. सोनललाही तिने घडलेली सगळी हकीकत सांगितलं, सोनलला खूप आनंद झाला. दोघांच्याही घरातली मंडळी एकमेकांना भेटली. निकिता आणि निखिल दोघेही हुंडा किंवा काहीही देण्या-घेण्या च्या विरुद्ध होते हे त्या दोघांनी आपापल्या घरी आधीच सांगितलं होतं. तरीही म्हणतात ना घरातल्यांपेक्षा बाहेरचेच जास्त उतावीळ त्याप्रमाणे घरातल्यांनी नाही पण भावकीतल्या लोकांनी मात्र प्रश्न केलाच...देण्या-घेण्याचं काय ? पण निखिलच्या वडिलांनी मात्र परिस्थिती सांभाळून घेतली आणि निकीताचे बाबाही बोलले माझ्या मुलीला मी जमेल तेवढं आनंदाने देणार. निकिताचे आजोबा त्यांना विचारल्याशिवाय लग्न ठरवल्यामुळे रागावलेले आणि इकडेे निखिलच्या आईचाही या लग्नाला पूर्णपणे होकार नव्हता त्यामुळे तिचीहि थोडी कुरकुर चालूच होती. एक ना अनेक गोष्टी मधे मधे येत होत्या, आणि हे पाहता निखिलला तर, हे लग्न कधी होईल असं झालं होतं. बोलतात ना नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न अगदी तशी अवस्था झाली होती.
पण बाप्पाने यांना भेटवण्याचा प्लॅन केलाच होता. देव जोड्या जुळवूनच पृथ्वीवर पाठवतो म्हणतात ना तेच खरं. एकदाची लग्नाची तारीख निघाली आणि दोघेही एकमेकांमध्ये गुंतून गेले. लगीनघाई मधे दोन्ही कुटुंब व्यस्त झाले होते. लग्नाची तारीख जवळ येत होती नवीन आयुष्य सुरु होणार याच्या आनंदाबरोबरच आपल घर आपल्याला सोडून जावं लागणार याची भीती निकिताला वाटत होती. कधीही घर सोडून न राहिलेली निकिता आता कायमची लग्न होऊन जाणार या जाणिवेने तिच्या आई-बाबांच्या डोळ्यात पाणी येत होत. इकडे मुलगा असला तरी, निखिलला टेन्शन आलेलं कि त्याच्यावर विश्वास ठेवून निकिता स्वतःच घर सोडून त्याच्यासोबत राहणार आणि त्याला तिला कोणत्याही बाबतीत निराश झालेलं पाहायचं नव्हतं.
पत्रिका छापल्या गेल्या. स्वतःचीच पत्रिका पाहुन निकिता गालातल्या गालात हसत होती. लग्नाची खरेदी आपापल्या पसंतीने झाली. सगळीकडे निखिल आणि निकिताच्या लग्नाची चर्चा सुरु झाली. सगळेजण होणाऱ्या नवरा-नवरीला जेवायला घरी बोलवु लागले.
दारी तोरण लागले. हॉलमध्ये सनई-चौघडे वाजू लागले. देवा-ब्राह्मणांच्या साक्षीने दोघांनी शपथ घेतली एकमेकांना साथ देण्याची. मंगलाष्टकांच्या नादात दोघांवर अक्षदा पडल्या आणि दोघांनी एकमेकांना हार घातला, निखिलने निकिताच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं आणि हा लग्नसोहळा संपन्न झाला.
अशाप्रकारे, जुळून आल्या या रेशीमगाठी…
#@ समाप्त @#
Awesome. Happy Ending. Infact happy start of the married life.
ReplyDeleteAwesome. Happy Ending. Infact happy start of the married life.
ReplyDelete