Skip to main content

भाग्यरेषा ...भाग१






हाराष्ट्रात थेरगाव म्हणून एक छोटंसं गाव होत. गावात ५०-६० घर असावीत. त्या गावात परशुराम पाटील नावाचे गृहस्थ होते, जे या गावचे सरपंच होते. ४५ च्या आसपास वय, किडकिडीत देहयष्टी, डोक्यावर बांधलेला फेटा, अंगात पांढरा सदरा आणि धोतर. गावातल्या काही अडी-अडचणी, समस्या समजुन घेऊन त्यावर योग्य आणि लोकहीतकारक सल्ला देऊन ते नेहमीच लोकांची मदत करायचे. कोणाची पैस्यांची गरज लक्षात घेऊन त्याची ही नड ते भागवत. एकंदर प्रेमळ, माणुसकीबाज असा हा माणुस. गावातले लोक त्याचा आणि त्याच्या कुटुंबाचा फार आदर करीत. तो म्हणेल तेच योग्य असा लोकांचा त्यावर पुर्ण विश्वास होता.
परशुराम धन- दौलत, नोकर-चाकर सगळं असुनही त्यांना कौटुंबिक समाधान मात्र हवे तसे नव्हते. परशुरामचे आई-वडील गेले आणि घराची- शेतीची सगळी जबाबदारी त्यांच्यावर आली. परशुरामचे लग्न झाले. त्यांची बायको सुमित्रा फार सुंदर आणि स्वभावाने चांगली होती. त्यांना एकूण दोन मुले झाली. त्यातील पहिला अनिल. त्याच्या जन्माने गावकरी ही फार खुश झाले. जसा- जसा अनिल मोठा झाला तसं त्याचं अपंगत्व सगळ्यांना कळालं, बरेच औषधोपचार केले, अंगारे-धुपारे केले पण काही फरक नाही आणि सगळ्यांच्या काळजात धस्स झालं. लोकांनी खूप हळहळ व्यक्त केली. एवढा चांगला माणुस पण देवाने त्याच्याच सोबत अशी खेळी का खेळावी.
पण परशुराम स्मित हास्य करून, “ जशी देवाची इच्छा” एवढंच बोलत. अनिल बिचारा सगळ्या गोष्टींसाठी दुसऱ्यांवर अवलंबुन पण तरीही समंजस. घरीच त्याला जेवढं शिकवता येईल तेवढं परशुराम शिकवतं.
सुमित्राला पुन्हा दिवस गेले. त्या दोघांनाहि मुलगी हवी होती पण तिला मुलगा झाला त्याचं नाव सुनिल. त्याचे खुप लाड व्हायचे. सुनिल मस्तीखोर आणि खोडकर होता. सुमित्रा मुलांनी मागितलेल्या प्रत्येक गोष्टी त्यांना पुरवायची. सुनिल शाळेच्या नावाने बाहेर फिरायचा, कोणाच्या झाडांची फळे तोडायचा, शेतातली नासधूस करायचा पण परशुरामांचा मुलगा म्हणून कोणी त्याची कधी तक्रार करत नसे. जसा-जसा सुनिल मोठा होत होता तशा त्याच्या खोड्या वाढत चाललेल्या. हळूहळू परशुरामाच्या कानावर येऊ लागलं होतं. त्याने सुनिल ला तशीे समजही दिली पण त्या दिवसापूरताच काय तो फरक पडे. सुमित्रा मात्र लहान आहे म्हणून सुनिलची बाजु घेई. सुमित्राची तब्येत अचानकच बिघडु लागलेली. बरेच उपचार करूनही, परशुराम तिला वाचवु शकला नाही. मनातुन कोसळलेला परशुराम स्वतःलाच समजावत असे. सुनिलने जेमतेम शिक्षण पूर्ण केलं.दिवसभर मित्रांसोबत फिरणे, वडिलांच्या पैशांवर मजा करणे, हाच त्याचा दिनक्रम. परशुरामने त्याला बराच समजावण्याचा प्रयत्न केला पण तो निरर्थक ठरला. अनिलने ही त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण तो कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. परशुरामने रागवून शेवटी त्याला पैसे देणं बंद केलं. त्याला वाटलं निदान पैसे नाहीत म्हणून तरी तो सुधारेल पण सुनिल खुपच हुशार होता. त्याने आपल्या वडिलांच्या नावाचा उपयोग करायला सुरुवात केली. आपल्या वडिलांनी तुमच्यावर कसे आणि किती उपकार केले याची आठवण तो लोकांना करून देऊ लागला आणि त्यांच्याकडून पैसे घेऊ लागला. परशुराम, सुनिल च्या अशा वागण्याला कंटाळला होता. त्याला काहीच कळत नव्हते. त्यांच्या चेहऱ्यावर सततची काळजी पाहुन काही गावकरी त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी त्याला सुनिलच्या लग्नाची युक्ती सुचवली. परशुराम सुरुवातीला या गोष्टीला तयार नव्हता पण नंतर अनिलची हालत बघुन आणि सुनिलही संसारात रुळला तर सुधारेल असा विचार करून सुनिलच्या लग्नाला तयार झाले. या घराला एक स्त्री च व्यवस्थित सांभाळू शकते. हा विचार करून त्यांनी स्थळ शोधायला सुरुवात केली. आजुबाजूच्या सगळ्या गावांमध्ये सुनिलची कीर्ती पसरलेली असल्यामुळे कोणीच आपली मुलगी त्याला दयायला तयार नव्हते. सुनिल ला मात्र लग्न करायची मुळीच इच्छा नव्हती. त्याच गावात कमळा आणि तिचा भाऊ शामराव रहात होते. कमळा रूपवान आणि नखरेल नार होती आणि तिचा भाऊ शामराव बहिणीने कमावलेल्या पैशांवर जगणारा. गावा-गावातं जाऊन पैसेवल्याना लुटणं हेच यांचं काम. सुनिलला कमळा खुप आवडत होती. रोज जाऊन तिच्यावर वाट्टेल तसे पैसे तो उधळीत. कमळा आणि शामराव भलतेच हुशार होते. सुनिल ला फसवुन, कमळाशी लग्नाचा वायदा करून त्याच्याकडून ते पैसे उकळीत होते. सुनिल च्या लग्नाची बोलणी सुरू झालेली कळताच, कमळा आणि शामराव घाबरले, आयता बकरा कसा हातातुन जाऊ द्यायचा…
त्यांनी सुनिलला भडकवायला सुरुवात केली आणि सुनिल रोज दारू पिऊन घरी तमाशे करू लागला. परशुरामला आता सुनिलचं वागणं असह्य होऊ लागलं होतं. त्याने सुनिल ला सांगितलं, की जर त्याने परशुरामने सांगितलेल्या मुलीशी लग्न नाही केलं तर तो त्याला घरातुन काढून टाकेलं आणि त्याच्या प्रॉपर्टी मधलं त्याला काहीही देण्यात येणार नाही. सुनिलने ही गोष्ट कमळा आणि शामराव ला सांगितली. हे ऐकून ते दोघेही घाबरले कारण पैस्याविना सुनिल त्यांच्या काहीच कामाचा नव्हता. त्यांनी दोघांनी मिळून एक युक्ती केली. त्याप्रमाणे त्यांनी सुनिलला लग्नाला होकार द्यायला सांगितला. सुनिल ते म्हणतील तसं वागत होता. सुनिलने परशुरामची अट मान्य केली. परशुरामला साधी- सरळ आणि मेहनती मुलगी सून म्हणून हवी होती. खुप दिवस स्थळ शोधण्यात गेले आणि मग एक मुलगी परशुराम च्या डोळ्यात भरली. नाकीडोळी सुरेख, सावळा रंग, मेहनती आणि हसतमुख चेहरा. तीच नाव शोभा. शोभा, आई-वडील आणि ४ बहिणींसोबत राहत होती. परिस्थिती हलाकीची होती. वडील शेतकरी. ती आईला घरच्या कामात मदत करत असे. हुशार असुनही घरच्या परिस्थितीमुळे तिला शिक्षण अर्धवट सोडावं लागलं होतं. कधीही कोणत्याही गोष्टीत तिची तक्रार नसे. अशी परिस्थितीची जाण असलेली ही शोभा, परशुरामाने सुनिलसाठी पसंत केली. घर चांगलं आहे बघून आई-वडिलांनी लग्नाला होकार दिला. आपल्या पोरींचं नशीब चांगलं जे एवढ्या मोठ्या घरात ती जाते, हा विचार करून घरी सगळेच खुश झाले. परशुरामने पण लग्नाचा सगळा खर्च स्वतः करत असल्याचे सांगितले. लग्नाची तारीख ठरली, सगळीकडे आनंद ओसंडुन वहात होता. गावकरी नवीन सुनेच्या स्वागताची तयारी करत होते पण सुनिलला मात्र काहीही देणंघेणं नसल्यासारखा तो वागत होता. अजुनही त्याचं कमळाला भेटणं चालुच होतं. घरी पाहुणेमंडळी जमायला लागली होती. एवढ्या वर्षांनीं घरात काहीतरी मंगलकार्य घडणार होतं. शोभाचे गाव फारच लांब असल्यामुळे १ दिवस आधिच त्यांना थेरगावला बोलावुन परशुरामने त्यांची राहण्याची सोय करून ठेवली होती. त्याप्रमाणे मंडळी आदल्या दिवशीच आले. परशुरामने त्यांच्या आदरातिथ्यात काहीही कमी पडु दिले नाही. लग्नाचा दिवस उजाडला. सगळीकडे सनई- चौघड्यांचा आवाज दुमदुमत होता, पाहुण्यांची वर्दळ, काही जणांची धावपळ, लाऊडस्पीकरवर मंत्रांच्या जपाचा आवाज. एवढ्या गोंधळातसुद्धा खुप प्रसन्न वाटत होतं. मंगलाष्टका झाल्या आणि दोघांच्या डोक्यावर अक्षता पडल्या. शोभा मनातून खुश तेवढीच घाबरलेली होती. संपूर्ण कार्यक्रम खुपच छान झाला. परशुराम शोभाच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाला, “हे बघ बेटा, तु मला मुलीसारखी आहेस. या घरात जे काही आहे ते तुझंच आहे त्यामुळे अजिबात लाजायचं नाही. कुठल्याही गोष्टीची गरज पडलीच तर बिनधास्त सांग.”
शोभाने हसुन मान हलवली. 
सकाळी लवकर उठुन शोभा सगळी काम उरकु लागली. अनिलच्या औषध पाण्याकडे लक्ष देऊ लागली. सुनिलशी बोलण्याचा तिने प्रयत्न केला पण तो घरात थांबतच नसे. घरी कोणीही व्यक्ती भेटायला आली तरी त्यांना जेवल्याशिवाय ती जाऊ देत नसे. प्रत्येकाशी आदराने आणि प्रेमाने वागे. हळूहळू तिने सगळ्यांचं मन जिंकुन घेतलं. गावकऱ्यांना ही परशुरामच्या सुनेबद्दल आपुलकी आणि थोडं दुःख वाटत होतं. एवढं सगळं चांगलं असुनही सुनिल मात्र तिच्याशी नीट बोलतही नसे. अनिलने, सुनिलला थोडं समजावण्याचा प्रयत्न केला.
अनिल, “ सुनिल अरे किती चांगली आहे वहिनी, माझ्याकडे आपल्या आईसारखं लक्ष देते आणि तू मात्र तिच्याशी नीट बोलत देखील नाही.”
सुनिल, “हे बघ दादा, ती माझी बायको आहे मला हवं तसं मी तिच्यासोबत वागेन तु सांगायची गरज नाही मला.” असं रागाने बोलून तावातावाने तो तिथून निघून गेला.
लग्नाला १ वर्ष झालं तरी सुनिल आणि शोभाच म्हणावं तस वैवाहिक जीवन सुरू झालं नव्हतं. कधीतरी एकट्यात शोभा रडून मन मोकळं करी पण परशुरामला किंवा कोणालाही कधी तक्रार नाही केली. परशुरामनेही त्याला बऱ्याच वेळा प्रेमाने सांगायचा प्रयत्न केला पण त्याच्यामध्ये काहीही फरक नाही.
एक दिवस त्यांनी शोभाला बोलावलं. शोभा पदराला हात पुसत-पुसत परशुरामकडे आली.
परशुराम, “ शोभा, ये बाळा बस.”
शोभा, “काय झालं मामांजी, काही हवंय का तुम्हाला?”
परशुराम, “नाही ग, तु ये आधी इथे बस”
शोभा येऊन बाजूच्या खुर्चीवर बसते.
परशुराम हात जोडत, “मला माफ कर बाळा”
शोभा घाबरत, “ अहो मामांजी, असं का बोलताय तुम्ही ? काय झालं ?”
परशुराम, “मला माहित आहे सुनिल तुझ्याशी नीट वागत नाही, बोलत नाही म्हणून त्याच्यावतीने मी माफी मागतोय.”
शोभा ते ऐकताच चटकन डोळ्यात आलेलं पाणी पदराने पुसू लागते.
परशुराम, “हे बघ बाळा, आपल्याला काहीतरी करायला हवं. त्याच्याशी बोल, त्याच्या आवडी-निवडी जाणून घ्यायचा प्रयत्न कर. एक बायको म्हणून तुच त्याच मनपरिवर्तन करू शकतेस आणि मला विश्वास आहे की तु हे नक्की करू शकशील.”
शोभा डोळे पुसत, “ हो मामांजी, मी नक्की हे करणार”
शोभा सुनिलला जिंकण्यासाठी बरेच प्रयत्न करू लागली होती.
इकडे कमळा आणि शामराव ला भीती वाटु लागली होती जर सुनिल, कमळाला सोडून गेला तर त्यांची कायमची कमाई बंद होऊन जाईल. त्या भीतीने कमळा आणि शामरावने सुनिलला, परशुराम आणि शोभा बद्दल भडकवायला सुरुवात केली, की कशाप्रकारे त्यांनी सुनिलला फसवुन त्या शोभाशी, जी त्याला अजिबात शोभत नाही, दिसायला काळी आहे अशा मुलीशी लग्न करून दिलं. त्यांनी त्याला शोभाला घटस्फोट देण्याचा सल्ला दिला पण परशुरामांनी त्याला बजावलं की जर त्याने असं केलं तर त्याला त्यांच्या प्रॉपर्टीतुन बेदखल केलं जाईल. सुनिल फार चिडला, ही आत्ता आलेली मुलगी जास्त जवळची झाली माझ्या घरच्यांना आणि त्याने हे येऊन कमळा आणि शामरावला सांगितलं. हे ऐकताच त्या दोघांना घाम फुटला, ते घाबरले आणि त्याला कसा बसा समजावून परत घरी पाठवला. २ दिवसांनी मात्र शामरावला १ युक्ती सुचली त्याने, सुनिलला घरी जाऊन शोभाशी आणि परशुरामशी चांगलं वागण्याचा आणि बोलण्याचा सल्ला दिला. सुनिलला ते पटत नव्हतं पण कमळाने त्याच्याशी गोड बोलून त्याला समजावलं की शामरावने खूप छान अशी युक्ती सुचवलीये आणि जर आपण त्याप्रमाणे वागलो तर आपल्या दोघांना लग्न करता येईल आणि आपण सुखी राहू. हे ऐकून सुनिल तयार झाला. ठरल्याप्रमाणे सुनिल घरी आला. त्यादिवशी तो फार शांत होता. नेहमीप्रमाणे दारू प्यायला नव्हता. काहिही न बोलता शांतपणे जेवुन झोपुन गेला. शोभा, अनिल आणि परशुरामला ते थोडं वेगळंच वाटलं. करण दारू पिऊन काहीतरी बडबडत बसणं त्याचं हे रोजचंच झालं होतं किंवा बऱ्याच वेळा तो इतका प्यायचा की शामराव त्याला घरी सोडायला यायचा.
दुसऱ्या दिवशी सुनिलने नाश्ता केला आणि काही गावकरी बाहेर परशुरामकडे एक समस्या घेऊन आलेले त्यांच्याशी बोलु लागला आणि समजुन घेत होता. ते पाहून परशुराम आणि शोभा आश्चर्यचकित झाले कारण हे असं पहिल्यांदाच घडत होतं. परशुरामने आल्यावर सगळं ऐकून घेतलं आणि सुनिलच्या मदतीने योग्य तो निर्णय घेतला. सगळे गावकरी गेल्यानंतर परशुराम खुपच खुश दिसत होता, सुनिलने परशुरामकडे माफी मागितली आणि परशुरामने त्याला मिठीच मारली. शोभाला आवाज देऊन त्याने देवासमोर साखर ठेवायला सांगितले. शोभालाही फार आनंद झाला. तिने आज जेवणाचा चांगलाच बेत केला होता. आज कधीं नाही ते सुनिल, अनिलच्या जवळ बसून त्याच्याशी बोलत होता. शोभाने आवाज दिल्यावर सगळे एकत्र जेवले, गप्पा मारल्या. सगळं काही छान चालु होतं. जवळ-जवळ एक आठवडा झाला सुनिल चांगला वागत होता, घरात सगळे खुश होते पण त्याला मात्र आता कंटाळा आला होता या चांगला वागण्याचा अजूनही तो शोभाशी बायकोसारखं वागत नसला तरी निदान तो आता तिच्याशी नीटपणे बोलतो यातच तिला आनंद वाटत होता. सगळ्यांची नजर चुकवून आज बऱ्याच दिवसांनी तो कमळाला भेटायला गेला. कमळा आणि शामराव दोघे ही घरातच होते.
सुनिल : (त्यांच्याकडे पहात) मला कंटाळा आलाय आता या चांगल्या वागण्याचा, मी आणखी नाही असा राहू शकत...तु तर म्हटलेलास की काहीतरी युक्ती सुचली आहे तुला आणि त्यामुळे आपले सगळे त्रास संपतील आणि तु माझं आणि कमळाच लग्न लावुन देशील.
शामराव : हो. ते खरच हाय की. पण त्यासाठी जरा दमानं काम घ्यावं लागल.
सुनिल : अजून किती दिवस ?
शामराव : मला सांगा आता तुमच्या घरातली परिस्थिती काय हाय ?
सुनिल : काय असणारे अजून, सगळे खुश आहेत. बाबा कधी नाहीत ते माझ्याशी प्रेमाने बोलू लागले आहेत, माझं ऐकू लागले आहेत.
शामराव : लय भारी… आता बघा मी यापुढचं सांगतो तुम्हाला पण समदं कसं ठरल्याप्रमाण झालं पायजे. गडबड करायची न्हाई नायतर सगळा प्लॅन मातीत जाईल बगा.
शामरावने सगळा प्लॅन सुनिल आणि कमळा ला सांगितला ते दोघेही खुश झाले. तिघांनी एकमेकांकडे हसत पाहिलं आणि सुनिल तिथून निघुन गेला.

क्रमशः

Comments

Popular posts from this blog

मी जिजाऊ बोलतेय

पौष पौर्णिमा शके 1519 मध्ये म्हाळसा राणी आणि लखोजी राजे यांच्या घरी जन्माला आले तेव्हा दारा- दारांमध्ये रांगोळ्या काढल्या गेल्या, तोरण लावली गेली, हत्तीवरून साखर वाटण्यात आली.आमचं नाव जिजा ठेवण्यात आलं. जिजा म्हणजेच जय आणि विजय. आजूबाजूला सरदारांची वर्दळ, युद्धाचे डावपेच,सल्लामसलत, रयतेची गाऱ्हाणी...न्यायनिवाडे तर नित्याचेच हे असं होत आमचं बालपण. युद्धकला तर आम्ही शिकलोच होतो पण त्याचबरोबर 700 च्या वर आम्ही मुलींची 1 फौज तयार केली होती. पहाटे- पहाटे जेव्हा आम्ही घोड्यावरून रपेट करायला जायचो तेव्हा गावकुसातल्या काही बायका कौतुक करायच्या आणि काही नाकही मुरडायच्या, काही म्हणायच्या .. या पोरींचं कस होईल पण आम्ही निश्चय केलेला, स्वतः सोबत ...इतरांचं रक्षण करता आलं पाहिजे. म्हाळसा राणीच्या इच्छे खातर आम्ही 6 भाषा शिकलो,...मराठी, संस्कृत, उर्दू, अरबी, फारसी, कन्नड. रामायण- महाभारताबरोबरच, नामदेवांची गाथा, कबिराचे दोहे, कुराण, बायबल आम्ही वाचलं आणि समजूनही घेतलं आणि आमच्या मनात प्रश्न निर्माण झाला,...धर्म म्हणजे काय?..धर्म म्हणजे मानव सकल कल्याण कि कर्म कांड?, आम्ही तलवार चालवतो कुणासाठी?, प...

रेशीमगाठी... भाग १

भाग १ रे शीमगाठी वधू वर सूचक केंद्र ची फाईल वडिलांनी तिच्या हातात दिली आणि तिच्या पोटात गोळाच आला. आज पर्यंत नुसती चर्चा सुरु होती पण आता आई वडिलांनी लग्न हा विषय चांगलाच मनावर घेतला हे तिच्या लक्षात आलं आणि आपण खरंच लग्न कारण्याएवढं मोठं झालोय का, हा प्रश्न तिला पडला. वडिलांनी दिलेली फाईल घेऊन ती बेडरूम मध्ये गेली आणि त्यात असलेले कागदपत्र बघू लागली, त्यात बऱ्याच मुलांची माहिती होती. त्यातली काही बघितल्या सारखं केलं आणि लगेच मैत्रिणीशी चॅटिंग करायला सुरुवात केली. पण ...ती कोण? ती म्हणजे दिसायला बरी, रंग गोरा, पण उंची मध्ये मात्र मार खाल्ला (असं तिची काकी म्हणायची नेहमी) ती च नाव निकिता. निकिता अभ्यासात सामान्य पण बाकी नृत्य, गायन, खेळ यामध्ये नेहमी पुढे. मनाने साधी, कोणाला त्रास द्यायला आणि कोणि त्रास दिलेला हि आवडायचं नाही. तशीच तिची मैत्रीण सोनल. दोघींचा एकमेकांवर खूप जीव. शाळा , कॉलेज आणि पहिली नोकरी सुद्धा एकत्रच. तिला हे रेशीमगाठी च प्रकरण सांगितलं आणि मग निकिता चा जीव भांड्यात पडला. दोघीमंध्ये बराच वेळ गप्पा झाल्या. निकिता तिला आलेल्या टेन्शन बद्दल सोनल ला सांगत होती, अ...

डॉक्टर !!!

तो : काय रे डॉक्टर कधी येणार ? कंपाऊंडर : डॉक्टर साहेब काय आता येत नाहीत. तो : का रे ? वेळेत तर आलोय...माझ्या मुलीला फार ताप आलाय...नेहमी आम्ही याच डॉक्टरांकडे येतो... प्लीज त्यांना लवकरात लवकर कॉल करून बोलावून घे. कंपाऊंडर : अहो साहेब, नाई येणार ते… तो : असे कसे नाई येणार, तुला माहित नाही का मी कोण आहे ते… आत्ताच्या आत्ता फोन लावून बोलावून घे नाहीतर पार्टीतल्या लोकांना बोलावून तुझ्या त्या डॉक्टर च लायसेन्स रद्द करायला लावेन. जनतेची सेवा करायची करायची सोडून घरी आराम करत बसलाय काय? कंपाऊंडर : रागावू नका हो साहेब. मी ओळखलं तुम्हाला. पण परवाच एका विरोधी पक्षाच्या नेत्याचे वडील  अटॅक  येऊन गेले तर, कार्यकर्त्यांनी डॉक्टरांना मारहाण केली...लाथा- बुक्क्यांनी तुडवल आणि वर एकाने जाताना चाकू पण खुपसून गेला. आजच डॉक्टरांचं निधन झालं. बिचारे जाता - जाता पण….का डॉक्टर झालो म्हणत होते !!!