निकिता एक सर्व सामान्य घरातली मुलगी. घरात एकूण चार जण.. आई, वडील, छोटा भाऊ आणि निकिता. हे रेशीमगाठी प्रकरण चालु झाल्यापासून ती सतत विचार करायला लागली होती. आजही आई च्या सांगण्यावरून तिने साईट चालू केली आणि मुलांची माहिती डायरी मध्ये नोंद करू लागली. त्यातही आईच चालूच होत ...या मुलाचं आडनाव आपल्या नाते संबंधांमध्ये बसत नाही, या मुलाचं गाव खूपच लांब आहे. 3-4 मुलांचे फोन नंबर तिने आईच्या हातात दिले आणि ती बाजूला झाली आणि शेजारच्या छोट्या निनाद सोबत ती खेळू लागली. आई मात्र त्या नंबर वर कॉल करायचा प्रयत्न करत होती. तिने पहिला नंबर लावला,
आई,” हॅलो, मी सुमन पवार बोलते, तुमचा नंबर मला रेशीमगाठी च्या साईट वरून मिळाला. तुमची थोडी माहिती हवी होती…”
समोरची व्यक्ती ,” आमच्या मुलाचं लग्न झालं “
आई गडबडली, “ बर बर , ठीक आहे” बोलून तिने फोन ठेवला.
काही कळतं कि नाही...या लोकांना, लग्न झालं तर त्याच नाव काढून टाकायचं ना रेशीमगाठी मधून...असं पुट-पुटत तिने दुसरा नंबर लावला.
आई, “ हॅलो, मी सुमन पवार बोलतेय.. तुमचा नंबर मला रेशीमगाठी च्या साईट वरून मिळाला.”
समोरची व्यक्ती, “ हो. मी मुलाची आई बोलतेय.”
आई, “ आम्ही तशी पाहिली तुमची माहिती रेशीमगाठी वरून. आम्ही कुंडली पण पाहिली ऑनलाईन, २२ गुण जुळत आहेत. तुम्ही माझ्या मुलीचा रेशीमगाठी चा नंबर लिहून घ्या आणि नंतर काय ते सांगा फोन करून.”
नंबर घेऊन ठीक आहे बोलून समोरच्या व्यक्तीने फोन ठेवला.
असाच तिसऱ्या नंबर वर पण कॉल करून तिने , काय ते सांगा फोन करुन… असं बोलून महत्वाचं काम संपवलं.
दुसऱ्याच दिवशी दोन्ही मुलांच्या घरून फोन आला. आई ने रात्रीे जेवत असतानाच विषय काढला...वडिलांकडे बघत ती बोलू लागली, मी काल फोन केलेला ना त्या दोन मुलांच्या घरून फोन आलेला ते कधी येऊ विचारत होते. हे ऐकूनच निकिताच्या पोटात गोळा आला. वडिलांनी सांगितलं, एकाला शनिवारी संध्याकाळी आणि एकाला रविवारी संध्याकाळी बोलावूया. निकिता मात्र गपचूप जेवत होती. जेवण आटोपून लगेच तिने तिच्या मैत्रीनीला सोनलला मेसेज केला.
सोनल, “ काय यार, निकिता आपलं ठरलेलं ना या रविवारी आपण भेटायचं.”
निकिता, “ अग हो, पण तूच सांग...मी तरी काय करू, मलापण भेटायचं होत, एकतर नोकरीला लागल्यापासून आपल्याला भेटायला पण नाही जमत, पण आता जर मी काही बोलली तरी घरातले माझं ऐकणार नाहीत. जाऊदे पुढच्या रविवारी आपण नक्की भेटू.”
सोनल, “ बरं, चल मी जाते जेवायला” अस बोलून त्यांच्या गप्पा संपल्या.
मुळात मुलगी बघणे हा प्रकारच तिला आवडत नव्हता. एकतर त्या मुलीला छान तयार करून शोपिस सारखं सगळ्यांसमोर बसवणं आणि मग तिला वाट्टेल ते प्रश्न विचारण. त्यातही तिने जास्त बोलल तरी प्रॉब्लेम आणि जास्त बोललं नाही तरी प्रॉब्लेम. काही जण तर डायरेक्ट परीक्षेला बसल्यासारखे प्रश्न विचारतात. तिला काही दिवसांपूर्वी तिच्या ऑफिस मधल्या एका मैत्रिणीने सांगितलेला एक किस्सा आठवला, तिला एकदा एका मुलाने पेपर वाचते का रोज असं विचारलं, तिने हो सांगितलं आणि त्याने डायरेक्ट दुसऱ्या पानावरील पहिली बातमी कोणती हे सांग… असं विचारलं. त्यावेळी आपण किती हसलो पण खरंच असं मला कोणी विचारलं तर काय सांगू ? काही मुलं तर पॉलिटिक्स, मंत्रिमंडळ आणि कोणती खाती कोण सांभाळत हे विचारत बसतात… पण अजूनही कळत नाही की या सगळ्या गोष्टींचा लग्नाशी काय संबंध असतो आणि आता हीच परिस्थिती आपल्यावर येणार आहे. उद्या आपल्याला बघायला कोणीतरी येणार… हा विचार करत सारखी कुशी बदलून झोपायचा प्रयत्न निकिता करत होती. तिच्या शेजारीच झोपलेल्या आईने विचारलं, काय झालं निकिता ?
निकिता, “ काही नाही झोप येत नाहीये.”
आई, “ का ? कसला विचार करत आहेस ?”
निकिता, “काही नाही ग…”
निकीताच्या डोक्यावरून हळूच हात फिरवत आई बोलली, “ आई आहे ग मी तुझी, माहितीये मला… तु उद्याचा विचार करत आहेस, पण काळजी नको करुस एवढी. प्रत्येक मुलीच्या आयुष्यात हा क्षण येतो, आणि आम्ही सगळे असणारच आहोत तुझ्यासोबत आणि तुला योग्य वाटल तरच आपण पुढे बोलणी करायची. त्यामुळे एवढं टेन्शन नको घेऊ आणि झोप शांतपणे. कामावर पण जायचंय उद्या.”
आणि आई च्या कुशीत शिरून निकिता शांतपणे झोपली.
आईने सकाळीच सांगितलेलं, ते लोक 7 वाजेपर्यंत येतील. तु लवकर ये, लेट आलीस तर उगाच गडबड होईल. त्या दिवशी तिच्या हृदयाची गती फास्ट ट्रेन च्या पेक्षा जास्त असल्यासारखं तिला जाणवत होतं...
Good
ReplyDeleteChaan👌👌👌
ReplyDeleteKhupach chan..Pratyek mulichi hich awastha hot asnar mulga baghayala yenar yacha vichar karun.
ReplyDelete