निकीताच आज कामात काही लक्ष लागत नव्हतं. आईने सांगितल्याप्रमाणे आज ती ऑफिस मधून लवकर निघाली. ती येण्याआधीच सगळे घरी तयार होऊन बसलेले, नेहमी हाफ पॅण्ट घालणारा तिचा भाऊ आज फुल पॅण्ट घालून...शहाण्या बाळा सारखा नीटनेटका दिसत होता. आई वडील हि बऱ्यापैकी तयार झालेले आणि टीव्ही वर सिरिअल ऐवजी बातम्या लावल्या होत्या (इंप्रेशन पाडण्यासाठी). आईने निकिताला साडी हातात दिली नेसायला आणि पटकन तयार हो सांगितलं. आई तिला मदत करत होती तयार व्हायला, त्या बरोबरच ती निकीताला टिपण्या पण देत होती, तु आतमध्येच बस...मी बोलेन तेव्हाच बाहेर यायचं, बाहेर आल्यावर नॉर्मलीच बस… घाबरू नकोस, जेवढं विचारतील तेवढच बोल…निकिताच टेन्शन वाढत होत पण तिच्या आईचीही तीच अवस्था झालेली.
तेवढ्यात निकीताचा भाऊ...नितेश आला, “आई, कॉल आलेला ते लोक येतील 5 मिनिटात” आणि आई सरबत बनवायला गेली.
नितेश निकीताकडे बघून हसत म्हणाला, “ जास्त जोरात हसू नकोस ग त्यांच्यासमोर….नाहीतर घाबरतील ते लोक.”
निकिता चिडून, “बाळा, तु लहान आहेस अजून, फुल पॅण्ट घातल्याने कोणी मोठं होत नसत”
तेवढ्यात आईने किचनमधून आवाज दिला तेव्हा दोघे शांत झाले. वडील शांतपणे हॉलमध्ये बसून सकाळीच वाचलेला पेपर उगाचच चाळत बसलेले.
तेवढ्यात बेल वाजली आणि नितेशने दरवाजा उघडला आणि तिकडे निकिताच्या हृदयाचे ठोके वाढले. निकिता बेडरूम मध्ये बसून बाहेर च्या परिस्थिती चा अंदाज घेत होती. नितेश हळूच आत आला, “ ताई, त्याचे आई वडीलच आलेत फक्त, तो मुलगा आलाच नाही” हे सांगून परत बाहेर गेला. निकिताची थोडी निराशाच झाली, ज्याच्यासाठी हा सगळा कार्यक्रम चालू आहे तोच आला नाही मग काय उपयोग ?, तो का आला नसेल….त्याला खरच हि गोष्ट एवढी गरजेची वाटली नसेल? बाहेर चर्चा चालू होती, सरबत झाला आणि कांदेपोहे दिले आणि मग आई आत आली निकिताला बोलवायला, निकीताने आधीच सांगितलेलं मी एकाबाजूला बसेन खुर्चीत, त्यांच्यासमोर बसणार नाही. त्याप्रमाणे ती तिच्या ठरलेल्या जागी येऊन खाली मान घालून बसली. रितीप्रमाणे मुलाच्या आईने सुरुवात केली, तोच तो रटाळ प्रश्न, नाव सांग बाळा तुझं?
निकिता, “निकिता पवार”
शिक्षण किती झालं?, कामाला कुठे आहेस ?, लग्नानंतर जॉब करणार का ?, घर आणि जॉब दोन्ही सांभाळता येईल का ? असे अनेक प्रश्न झाले. आज पहिल्यांदा स्वतःच्याच घरात तिला बाहेरच्या लोकांची एवढी भीती वाटत होती. मग आईच्या सांगण्यावरून पुन्हा बेडरूम मध्ये गेली. पुन्हा थोडावेळ बाहेर चर्चा चालूच होती आणि मग त्यांची जायची तयारी चालु झाली आणि जरा निकिता ला बोलावता का मुलाच्या आईने म्हटल्यावर, आईने निकीताला आवाज दिला आणि हातात मिठाई चा पूडा देण्याच्या बहाण्याने मुलाची आई तिची उंची तपासू लागली हे निकिताच्या लक्षात आलं आणि मनातल्या मनातच तिला फार राग आला. वडील त्यांना बाहेर सोडायला गेले.
आई बोलू लागली, लोकं तशी चांगली वाटली पण मुलगा पण यायला हवा होता, पण त्याची आई बोलली, त्याला काही महत्वाचं काम होत म्हणून आला नाही.
निकिता भडकून बोलली, “अगं, एवढं कसलं महत्वाचं काम, लग्न त्याला महत्वाचं वाटत नाही का ?, याला आताच वेळ नसेल तर नंतर कसा वेळ मिळेल?, आणि जर मी म्हटली असती कि मला महत्वाचं काम आहे आणि तुम्हीच भेटून घ्या तर चालल असत का ? तेवढ्यात वडील आले आणि ती गप्प झाली. वडील, “यायला हवं होतं मुलाने, कितीही झालं तरी फोटो पाहणे आणि स्वतःहून भेटणे यात फरक असतोच, जाऊदे, बाकी सगळं ठिक वाटलं मला. त्यांच्याकडून काही कळालं तर पुढची माहिती काढू.
निकिता सोनलला मॅसेज करणार तेवढ्यात तिचाच मॅसेज आला, “ काय ग संपले का कांदेपोहे ?”
आणि ते वाचून निकीता गालातल्या गालात हसून बोलली, “हो. आत्ताच. एक परीक्षा संपली आता उद्या दुसरी”
सोनल, “सांग ना काय झालं?, कसा होता मुलगा ?, तुम्ही एकमेकांशी बोललात का ?”
निकिता, “अग, तो मुलगा आलाच नाही.”
सोनल, “ काय…?”
निकिता, “ अग, हो ना...त्याची आई सांगत होती, खूपच कामात असतो माझा मुलगा. आजपण येणार होता पण महत्वाचं काम आलं मधेच म्हणून नाही येऊ शकला….खूपच बढाई करत होती त्याची आई… लग्न हि आयुष्यातली एवढी मोठी गोष्ट सोडून त्याला बाकीची काम महत्वाची वाटतात आणि त्याच्या आईने मला माझी उंची विचारली आणि मी सांगून सुद्धा ती 2 वेळा माझ्या शेजारी उभी राहून, उंची तपासत होती आणि मला ते अजिबात आवडलं नाही.”
हे ऐकून सोनलला पण राग आला, “ तुझी सगळी माहिती चेक केलेली ना त्यांनी मग हे असं का वागतात...जर पटत नसेल तर कशाला हे लोक असा बघण्याचा कार्यक्रम ठेवतात ?, मुलींना कस वाटत असेल याचा कधी विचार का करत नाहीत” सोनलला पण हे पटत नव्हतं कारण तिच्या घरीही काही दिवसांपूर्वी असच काहीसं झालेलं, सोनल दिसायला छान होती पण सावळी होती. तीलापण बघायला येताना लोक हाच विचार करून यायचे कि फोटो मध्ये छान दिसतेय पण प्रत्यक्षात बघितल्यावर मात्र,...जरा जास्तच सावळी आहे असा शेरा द्यायचे. म्हणूनच तीलापण या सगळ्या गोष्टींचा राग येत होता.
बराच वेळ दोघींच्या गप्पा चालू होत्या आणि हळूहळू विषय बदलून...त्या ऑफिस पॉलिटिक्स वर चर्चा करू लागल्या. आईने आवाज दिला आणि मग निकिता आणि सोनल च्या गप्पा थांबल्या. निकिता आईला जेवण बनवायला मदत करत होती. आईने विषय काढला, “ तुला काय वाटत ?”
निकिता, “ कशाबद्दल ?”
आई, “अग , आज ते लोक आलेले त्याबद्दल…”
निकिता, “अग आई , पण त्या मुलाला आपण पाहिलं पण नाही आणि अजून काहीच माहित नाही त्यांच्याबद्दल आपल्याला. ”
ते जाऊदे… तुला सांगायचं राहूनच गेलं...अग मावशीचा कॉल आलेला मघाशी…. असं बोलून निकिताने विषय बदलला पण मनाशीच स्वतःला बोलत होती... आज आपण कितीही सुटका करुन घेतली असेल, तरी उद्या पुन्हा अशाच प्रसंगाला तोंड दयायचंय.
Khupach chan.
ReplyDeleteKhupach chan.
ReplyDelete