Skip to main content

रेशीमगाठी...भाग ४

ज रविवार...सगळ्यांचाच आवडता दिवस, पण निकिताचा मूड खराब होता. आज संध्याकाळी, पुन्हा कांदेपोहे चा कार्यक्रम, काल च्या अनुभवामुळे तिला आज एवढी भीती वाटत नसली तरी मनात चलबिचल चालूच होती. तिने रेशीमगाठी चालू केल आणि त्या मुलाची माहिती बघू लागली, तिच्यापेक्षा 3 वर्षांनी मोठा आणि एका मोठ्या कंपनीत वरिष्ठ पदावर होता. आईने जेवायला बोलावल आणि ती जेवायला गेली.
वडील आईकडे बघत, “ काल आलेले त्यांचा काही निरोप ?”
आईने नकारार्थी मान हलवली.
वडील, “ आज संध्याकाळी येणार आहेत त्यांची माहिती काढली, आपली मंदाकिनी आत्या आहे ना त्यांच्या गावचे आहेत हे. तिने सांगितलं तस कि लोकं चांगली आहेत, पण जमिनीवरून काहीतरी वाद चालू आहेत सांगत होती.”
आई, “ बाकी सगळं जाऊदेत पण मानस चांगली भेटणं महत्वाचं. अहो, माझी बहिण सिंधू आहे ना तिचा कॉल आलेला ती सांगत होती, बँकेत आहे मुलगा, वडील पोलीस मध्ये आहेत, 1 बहीण आहे. तिच्याच गावचे आहेत, दादर ला राहतात, ती ओळखते त्यांना.”
वडील, “ बरं, मग फोटो आणि बायोडेटा सांग त्यांना पाठवायला, आपलापण पाठवून देऊ.”
तिच्या बहिणीने आणलेलं स्थळ असल्यामुळे आई खुश होती आणि तिला खात्रीही वाटत होती.
संध्याकाळी जेवणाची तयारी लवकरच करून ठेवलेली, पाहुणे येणार होते म्हणून. निकिता तयारी करत होती. भाऊ पुन्हा फुल पॅण्ट घालून तयार झाला, वडील पेपर चाळत बसलेले.
नितेश बेडरूम मध्ये जाऊन निकिता कडे बघत, “ ताई, हि साडी ठीक आहे पण माझं एक ऐक…”
निकिता, “तूच सांगायचा राहिला होतास...सांग”
निकिता त्याच शांतपणे ऐकू लागली.
नितेश थोडासा विचार करून , “ताई….मी काय म्हणतो…. म्हणजे…. मला असं वाटतं….कि तू...मेकअप जास्त करू नकोस ग... समोरच्यांचा पण विचार करत जा”. हे ऐकून निकिता चिडली आणि नेहमीसारखी त्यांची भांडण चालू झाली. शेवटी आईने दोघांना शांत केलं.
थोड्यावेळाने मुलगा आणि त्याचे आई, वडील आले.
आई ने त्यांना चहा दिला आणि मग नाश्ता दिला आणि निकिताला बोलावलं. निकिताने फिकट गुलाबी रंगाची मस्त साडी नेसली होती, ती आली आणि बाहेर येऊन ठरलेल्या जागी बसली. सगळे निकीताकडे बघत होते, तिची आई निकीताला विचारु लागली, तुझं नाव काय बाळा ?, कामाला कुठे आहेस?, मग तु लग्नानंतर पण काम करणार आहेस ?
निकिता, “हो”
मुलाची आई, “ अग, पण आमच्या घरात कोणी मुली बाहेर काम करत नाहीत आणि मग घर कस सांभाळणार?”
निकिता दचकून आईकडे बघितलं, तस निकीताची आई बोलू लागली, “ आपल्यावेळी व्हायचं हो तस आता आजकाल असा कोणी विचार करत नाही आणि मुली….काम फक्त पैसे कमावण्यासाठी नाही तर स्वतःच्या पायावर उभ राहण्यासाठी करतात आणि घरातली काम काय हो...एकदा जबाबदारी आली की बरोबर सगळं होत.”
मुलाची आई, “ ते सगळं बरोबर आहे हो पण गावी आमची कितीतरी जमीन तशीच पडून आहे, मुंबईमध्ये स्वतःचे 3 फ्लॅट आहेत आणि आमचा एकुलता एक मुलगा एवढा कमावतो कि तिला पायावर उभ राहायची गरज काय आहे ?”
त्यांचं हे बोलणं… निकीताला खटकलं आणि तिच्या घरच्यांनाही, तिच्या आईने विषय बदलत म्हटलं...निकिता आणि त्या मुलाकडे बघत...तुम्हाला दोघांना जर काही बोलायचं असेल तर तुम्ही दोघे आत जाऊन बोला.
निकीता आणि तो मुलगा दोघेही आता गेले. त्या दोघांचे बोलणे झाले आणि मग मुलगा बाहेर आला आणि बसला, आणि मग त्यांनी निकीताला मिठाई दिली आणि ते निघून गेले.निकिता मात्र झालेला सगळा किस्सा सोनलला मेसेज करून सांगू लागली. आई, वडील आणि नितेश मात्र खूप उत्सुक होते…  आत मध्ये दोघांचं काय बोलणं झालं , हे जाणून घ्यायला. जेवताना आईने विषय काढला, “त्याच्या आईच बोलणं मला अजिबात पटलं नाही”
तस लगेच निकितापण बोलू लागली, “ मलापण अजिबात आवडलं नाही, त्यांच्याकडे पैसा आहे म्हणून मी घरात का बसायचं ?, मला माझं करिअर आहे की नाही ?, एवढ्या चांगल्या घरातले असून पण असे कसे यांचे विचार? मुलीने काय फक्त यांच्या घरातली काम करण्यासाठी लग्न करायचं? आणि एवढा पैसा आहे तर कामवाली नाही ठेवू शकत का?” सगळं एकदाच बोलून एकदाची शांत झाली. वडील काहीच बोलत नव्हते पण त्यांनाही त्यालोकांच पटलं नव्हतं. आई निकिता कडे बघत, “ आत मध्ये काही बोलणं झालं का ?”
निकिता, “ तेच ते तुझ्या आवडी-निवडी सांग?, आणि आईपुढे तरी काही बोलला नाही पण आत मला बोलतो, तुला हवं तर तू जा कामाला.”
आई, “मग?”
निकिता, “मग काय, मी फक्त मान डोलावली...कारण बोलण्यावरून माणसं कशी आहे ते कळालं , मग पुढे कशाला काय बोलायचं ?”
पुढे कोणीही काही न बोलता टीव्ही बघू लागले.
सोमवारी आईनेच स्वतःहून कॉल केला शनिवारी पाहुणे आलेले त्यांना.
आई, “ हॅलो, मी सुमन पवार बोलतेय, निकीताची आई.”
मुलाची आई, “हो...हो, ओळखलं”
आई, “ तुम्ही काल कॉल करणार होतात पण विसरला असाल म्हणून मीच केला.”
मुलाची आई, “ हो, अहो करणारच होते तुम्हाला संध्याकाळी. बोलले मी मुलाशी, निकिता खूप छान आहे हो….पण माफ करा तिची उंची….खूपच कमी आहे हो, म्हणजे आम्हाला काही नाही पण... ही आजकालची मूल म्हणजे….”
आई, “ बरं, ठीक आहे” असं बोलून तिने फोन ठेवला.
आणि लगेच सिंधू ला म्हणजे, तिच्या बहिणीला कॉल करून तिने सांगितलेल्या मुलाचा फोटो आणि माहिती मेलने पाठवायला सांगितली. दुसऱ्याच दिवशी वडील त्या मुलाचा फोटो आणि माहिती मेलवर पाहू लागले आणि आईलाही दाखवू लागले. मुलगा छान होता. बँकेत कामाला होता, त्याच्या घरी आई, वडील आणि बहीण. आईने फोन करून त्यांना बोलावून घेतलं. निकिता ऑफिस वरून आली, थोड्यावेळाने वडिलांनी तिला तो फोटो आणि माहिती दाखवली. आईच्या सांगण्याप्रमाणे 32 गुण जुळत होते.
एकंदरीत पाहता स्थळ चांगलं होत.
आई, “मुलाच्या घरून फोन आला होता, ते लोक उद्या येणारेत”. हे सगळं वडिलांना माहित होत तरीही आई, निकीताच्या कानावर जावं म्हणून मोठ्याने बोलून दाखवत होती.
वडील, “ ठीक आहे.”
निकीताला ऐकू आला तरी ती दुर्लक्ष केल्यासारखं करून , टीव्ही बघत होती. तीला खूप कंटाळा आलेला या सगळ्याचा...पण काय करणार, कोण ऐकणार….कधी कधी विचार करायची...या मुलांना आमच्या जागी बसवलं पाहिजे मग कळेल किती अवघडायला होत ते….त्यात काहीही प्रश्न विचारत बसतात.
ऑफिसला जाताना सकाळी आईने आठवण करून दिली, लवकर ये, मैत्रिणींसोबत गप्पा मारत बसू नकोस आणि ती चिडली.
निकिता, “ काल एवढं बाबांना सांगताना ऐकलय मी, पुन्हा पुन्हा सांगायची गरज नाही.” आणि बडबडत निघून गेली. नंतर थोडस वाईट वाटलं...आपण उगाच नकोतो राग आईवर काढतो. कधी कधी वाटत कि लवकर एकदाच लग्न झालं तर निदान हि शोपिसगिरी तरी बंद होईल. खरंच असं चेहरे बघून नुसतं या लोकांना कळत असेल का कि मी खरंच कशी आहे ?
ऑफिस मध्ये गेल्यावर मात्र काम करता करता ती आपोआप हे सगळं विसरून गेली. दिवस तसा चांगलाच गेला पण घरी जायची वेळ आली आणि परत डोक्यात तेच विचार सुरू झाले.
नेहमीसारखी घरात सगळी सेटिंग झालेली….नितेशची फुल पॅण्ट, वडिलांचा पेपर आणि टीव्ही वर बातम्या आणि हे बघून ती हसत हसत आत गेली. नेहमीप्रमाणे आईची धावपळ आणि तिला तयारी करायला मदत करू लागली. थोड्यावेळातच मंडळी आली. त्याचे आई, वडील, बहीण, तो आणि त्याचा मित्र. चहा -पोहे दिले आणि निकिता बाहेर आली.
तेच नाव, गाव, काम हे प्रश्न झाले आणि मग त्याच्या आईने विचारलं, “लग्नानंतर काम करायची इच्छा आहे ?”
निकिता, “ हो”
मुलाची आई, “ आमच तस काही नाही बघ, तुला वाटतंय तू कर, नसेल जमत नको करुस.”
निकिताला थोडं बर वाटलं. दिसायला आणि राहणीमान बघता खूपच साधी वाटत होती त्याची आई. निकीताने हळूच वरती बघून मुलाकडे बघू लागली. पण मुलगा मान खाली घालुन बसला होता.
मुलाची आई, “ हे आता रिटायर होतील आणि मग आम्ही दोघे जाऊ गावी मग काय तुम्ही काय तो, तुमचा संसार सांभाळा. कधीतरी येऊ अधून मधून. शेतातल काही काम येत ?”
निकिता दचकली. आई, “ अहो तिला आमची शेती कुठे कुठे आहे ते अजून माहित नाही .
मुलाची बहीण, “ नाही हो काकू, आई मस्करी करतेय. तसं मला आणि दादाला तरी कुठे काय येत शेतीतल.” आणि सगळे हसायला लागले. निकिताने हि जबरदस्ती हसायचं प्रयत्न केला.
मुलाची आई, मुलाकडे बघत “ अरे, तू विचार कि... काही विचारायचं असेल तर”
आणि निकीताने त्याच्याकडे पाहिल...पण तो आईकडे बघत म्हणाला...तुम्ही विचारलत ना, अजून काय विचारु मी. त्याची आई, “ अरे, विचार काहीतरी”
मुलगा आईकडे बघत, “ तुम्हाला जेवण बनवायला आवडत का ?
निकिता, “ हो”
आणि नंतर त्याचा मित्र प्रश्न विचारु लागला. निकिता मनात विचार करू लागली. हा मुलगा मला बघायला आलाय पण मान खाली घालुन बसलाय कधीचा आणि त्याचा मित्र मला प्रश्न का विचारतोय…?
रात्री जेवताना विषय निघाला आई आणि बाबांचा त्यांच्या बोलण्यावरून तरी वाटत होत, त्यांना हे स्थळ पसंत आहे आणि निकिता बोलू लागली, “अग आई तो मुलगा माझ्याकडे बघायला तयारच नव्हता , काहीही बोलायचं असेल तर तो त्याच्या आईकडे बघूनच बोलत होता….तिला मधेच थांबवून नितेश बोलू लागला, “ अग , पण तू अशी बघत होतीस त्याच्याकडे म्हणून तो घाबरून आईकडे बघत असेल”
निकिता, “ ए नित्या गप रे, मान्य आहे कि लोक चांगली आहेत, पण त्याचा मित्र, त्याच्यापेक्षा जास्त प्रश्न विचारत होता मला, तू सांग लग्न नक्की तो करणार आहे की मित्र , मला नाही पटलं अजिबात आणि किती शांत आणि सभ्य वाटत होता तो.”
नितेश, “ हो ना, मला खूप काळजी वाटते, चुकून जरी यांचं लग्न झालं तर ….ताई स्वतःच्या तालावर नाचवेल ग त्या बिचाऱ्या मुलाला…”
आणि सगळेच जोरात हसू लागले...

Comments

Popular posts from this blog

मी जिजाऊ बोलतेय

पौष पौर्णिमा शके 1519 मध्ये म्हाळसा राणी आणि लखोजी राजे यांच्या घरी जन्माला आले तेव्हा दारा- दारांमध्ये रांगोळ्या काढल्या गेल्या, तोरण लावली गेली, हत्तीवरून साखर वाटण्यात आली.आमचं नाव जिजा ठेवण्यात आलं. जिजा म्हणजेच जय आणि विजय. आजूबाजूला सरदारांची वर्दळ, युद्धाचे डावपेच,सल्लामसलत, रयतेची गाऱ्हाणी...न्यायनिवाडे तर नित्याचेच हे असं होत आमचं बालपण. युद्धकला तर आम्ही शिकलोच होतो पण त्याचबरोबर 700 च्या वर आम्ही मुलींची 1 फौज तयार केली होती. पहाटे- पहाटे जेव्हा आम्ही घोड्यावरून रपेट करायला जायचो तेव्हा गावकुसातल्या काही बायका कौतुक करायच्या आणि काही नाकही मुरडायच्या, काही म्हणायच्या .. या पोरींचं कस होईल पण आम्ही निश्चय केलेला, स्वतः सोबत ...इतरांचं रक्षण करता आलं पाहिजे. म्हाळसा राणीच्या इच्छे खातर आम्ही 6 भाषा शिकलो,...मराठी, संस्कृत, उर्दू, अरबी, फारसी, कन्नड. रामायण- महाभारताबरोबरच, नामदेवांची गाथा, कबिराचे दोहे, कुराण, बायबल आम्ही वाचलं आणि समजूनही घेतलं आणि आमच्या मनात प्रश्न निर्माण झाला,...धर्म म्हणजे काय?..धर्म म्हणजे मानव सकल कल्याण कि कर्म कांड?, आम्ही तलवार चालवतो कुणासाठी?, प

डॉक्टर !!!

तो : काय रे डॉक्टर कधी येणार ? कंपाऊंडर : डॉक्टर साहेब काय आता येत नाहीत. तो : का रे ? वेळेत तर आलोय...माझ्या मुलीला फार ताप आलाय...नेहमी आम्ही याच डॉक्टरांकडे येतो... प्लीज त्यांना लवकरात लवकर कॉल करून बोलावून घे. कंपाऊंडर : अहो साहेब, नाई येणार ते… तो : असे कसे नाई येणार, तुला माहित नाही का मी कोण आहे ते… आत्ताच्या आत्ता फोन लावून बोलावून घे नाहीतर पार्टीतल्या लोकांना बोलावून तुझ्या त्या डॉक्टर च लायसेन्स रद्द करायला लावेन. जनतेची सेवा करायची करायची सोडून घरी आराम करत बसलाय काय? कंपाऊंडर : रागावू नका हो साहेब. मी ओळखलं तुम्हाला. पण परवाच एका विरोधी पक्षाच्या नेत्याचे वडील  अटॅक  येऊन गेले तर, कार्यकर्त्यांनी डॉक्टरांना मारहाण केली...लाथा- बुक्क्यांनी तुडवल आणि वर एकाने जाताना चाकू पण खुपसून गेला. आजच डॉक्टरांचं निधन झालं. बिचारे जाता - जाता पण….का डॉक्टर झालो म्हणत होते !!!

" सॉरी (Sorry)" ... Just a word

आज १ दिवस झाला तरी दोघे एकमेकांशी बोलत नव्हते. ३ वर्षांनी घरात पाळणा हलला होता. दोघेही बाळावर प्रेम खूप करायचे पण तेव्हापासून दोघांमध्ये काहीतरी बिनसलं होतं. एकाबाजूला त्याच्या कामाचा व्याप वाढलेला, जबाबदारी वाढलेली, तर दुसऱ्या बाजूला तिची बाळामुळे मानसिक आणि शारीरिक दमछाक होत होती. कुठला राग कुठे निघत होता, काहीच कळत नव्हतं. आधी कधीच अस झाल नव्हतं.  मुलासामोर मात्र ते दोघे नॉर्मल च होते. या वेळी दोघांनीही ठरवलेलं मी नाही सॉरी बोलणार, नेहमी मीच का सॉरी बोलु ? त्यांच्या २ वर्षाच्या बाळाला मात्र काहीच कळत नव्हत.  बाळ निरागस पणे खेळण्यात बिझी होतं. बाबा कामावरून आला. ती पाण्याने भरलेला ग्लास आणून समोर ठेवते आणि किचन मध्ये निघून जाते. तो थोडंसं पाणी पितो आणि ग्लास टेबलवर ठेवून फ्रेश व्हायला निघून जातो. ५ मिनिटांनी जोरात आवाज होतो म्हणून दोघेही बाहेर धावत येतात आणि पाहतात तर, त्यांचा मुलगा तो ग्लास उचलून आत ठेवायला जात असताना पाय अडकुन पडतो आणि त्याच्या हातातला पाण्याचा ग्लास खाली पडतो. मुलगा घाबरून उठतो आणि कान पकडून ..." सॉली " बोलत आईला जाऊन मिठी मारतो आणि आई - बाबा