Skip to main content

रेशीमगाठी...भाग ६

संध्याकाळ झाली आणि घरात गडबड सुरु झाली. नेहमीप्रमाणे नितेशची फुल पॅण्ट, बाबांचा पेपर आणि बातम्या. पाहुणे आले. निकिता आत मध्ये बसलेली. निकीताचा जासुस बनून नितेश गुपचूप आत आला आणि निकीताला बाहेरची परिस्थिती सांगू लागला.
नितेश, “अग ताई, हे लोक पूर्ण खानदान च घेऊन आलेत.”
निकिता घाबरून, “काय ? अरे फुकटच खायचं म्हणून एवढ्या लोकांनी यावं का ?”
नितेश चहा द्यायला म्हणून परत बाहेर निघून गेला.
निकीताला रागच आला त्यांचा. एवढ्या सगळ्यांना चहा, नाश्ता, बिचाऱ्या आईची किती धावपळ होते या सगळ्यात? तेवढ्यात आई आत आली निकीताला बोलवायला आणि निकिता बाहेर जाऊन तिच्या ठरलेल्या जागेवर जाऊन बसली. तिने हळूच सगळ्यांकडे पाहिलं तर मुलगा, त्याचा भाऊ, त्याचे आई-वडील आणि काका-काकी आलेले. तिने हळूच मुलाकडे पाहिलं आणि त्याचक्षणी तिच्या लक्षात आलं की तो मुलगाही तिच्याकडेच पाहत होता आणि तिने लगेच नजर खाली केली. त्याच्या आईने ओळख करून दिली सगळ्यांची आणि नेहमीप्रमाणे प्रश्नोत्तरांना सुरुवात झाली. मुलानेही विचारले काही प्रश्न. नंतर आईने तुम्हाला दोघांना काही बोलायचं असेल तर आत जाऊन बोला असं म्हटलं. निकिता आणि तो मुलगा आत गेले. थोडावेळ शांतताच होती. दोघेही काहीच बोलले नाहीत, काय बोलावे दोघांनाही कळत नव्हतं. शेवटी मुलाने पुढाकार घेतला.
मुलगा, “ माझं नाव निखिल देशमुख.”
निकिताने हसून पाहिलं त्याच्याकडे.
निखिल, “तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता”
निकिता, “तुम्ही जॉबला कुठे आहात?”
निखिल, “ तुम्ही माझी माहिती पाहिली ना ?”
(निकिता मनातल्या मनात, अरे यार आईने सांगितलेलं आणि मी विसरली.)
निकिता थोडस हसून, “ अ….. हो, पाहिलीये.”
निखिलच्या लक्षात आलं की हिला काही माहित नाही आपल्याबद्दल.
निखिल, “मी कुठे राहतो माहितीये ना तुम्हाला ?”
निकिता, “कुठे”
निखिल, “ तुम्ही माझी माहिती बहुतेक पाहिली नाहीये, खरंच सांगा तुम्हाला लग्न नाही करायचंय का ? कोणी जबरदस्ती नाही ना करत आहे ?”
निकिता, “अहो नाही हो. मला लग्न करायचं आहे, पण तुमची माहिती मी पहायलाच विसरले.”
निखिल, “ ठीक आहे … काही हरकत नाही.”
निखिल तिला स्वतःची सगळी माहिती सांगू लागला. निकिता मात्र डोकं हलवून ऐकत होती आणि तो विचारेल त्या प्रश्नाचं उत्तर देत होती आणि अचानक लाईट गेली आणि सगळीकडे अंधार झाला. आईची धंदालच उडाली, निकिता लगेच बेडरूम मधून उठून मोबाइलचा टॉर्च चालू करून आईला मेणबत्ती शोधायला मदत केली आणि पुन्हा आत गेली. निखिल उठला आणि तिच्याकडे बघून म्हणाला, “मला तुम्ही पसंत आहात, मला तुमच्याशी लग्न करायला आवडेल. तुम्हाला माझ्याबद्दल काहीही विचारायचं असेल किंवा काहीही शंका असेल माझ्याबद्दल तर तुम्ही विचारू शकता.” हे ऐकून निकीता चे हात-पाय थंड पडले आणि तिला काय बोलू कळतच नव्हतं. निखिलने तिला त्याचा नंबर लिहून घ्यायला सांगितला, आधीच लाईट नव्हती त्यात पेन कुठे शोधू म्हणून तिने मोबाईल मध्ये निखिलचा नंबर टाईप करुन,मोबाइल बाजूला ठेवला. निखिल बाहेर गेला. निकीता च्या पोटात गोळा आला होता. बाहेरून आवाज आला, म्हणून ती बाहेर गेली. ते लोक निघून गेले.
निकिता बेडरूममध्ये आली. आई-बाबा बाहेर बसून चर्चा करत होते. निकिता विचार करू लागली, असं पहिल्याच भेटीत यामुलाने मला का पसंत केलं असेल ?, तो मला ओळखत नाही ?, त्याच्याबद्दल मी काही माहिती वाचली नव्हती तरी त्याला रागही आला नाही माझा ?. खरंच त्याला मी आवडली असेल ? आणि तेवढ्यात लाईट आली.
निकिताने मोबाईल चालू केला आणि सोनलला फोन लावणार तेवढ्यात चुकून तिच्या मोबाइल वरून दुसऱ्याच नंबरवर कॉल लागला आणि फोन वाजण्याच्या आत तिने तो कॉल कट केला. निकिताच्या हृदयाचे ठोके फास्ट ट्रेन पेक्षा जोरात धावू लागले होते कारण तो नंबर निखिलचा होता आणि मघाशी तिनेच टाईप करून ठेवलेला आणि ती विसरून गेली आणि आता त्याच नंबरवर चुकून कॉल लागलेला. आजपर्यंत तिला पाहायला आलेल्या कोणत्याही मुलाकडे तिचा नंबर नव्हता, तिच्या आई-वडिलांचा नंबरच सगळ्यांना माहित होता. मग स्वतःलाच समजावु लागली...कॉल नाही लागला, त्यामुळे काही टेन्शन नाही. ती बाहेर जाऊन टीव्ही बघत असताना अचानक एक अनोळखी नंबर वरून कॉल आला आणि निकीता घाबरली कारण तो निखिलचा नंबर होता. तीने बेडरूम मध्ये जाऊन फोन उचलला.
निकिता घाबरत, “ हॅलो”
निखिलला तिचा नंबर माहित नव्हता, “ हॅलो, कोण बोलतय? मला या नंबरवरून मिसकॉल आलेला.”
निकिता, “अ….मी निकिता”
निखिल, “ अच्छा, हा तुमचा नंबर आहे”
निकिता, “ सॉरी, तुम्ही मघाशी नंबर दिला होता, चुकून माझ्याकडून कॉल लागला तुम्हाला. सॉरी…”
निखिल, “अहो सॉरी कशाला ? ठीक आहे चुकून लागला असेल, काही प्रॉब्लेम नाही.”
निकिता, “ ठीक आहे” आणि तिने फोन ठेवला. नितेश आत आला, निकिता विचार करत होती, घरात कोणालातरी माहिती पाहिजे, नंतर उगाच काही गडबड झाली तर...
नितेश निकिताकडे बघत, “काय ग, काय झालं ? ते लोक तर मगाशीच गेले मग तू का अजून टेन्शनमध्ये?”
निकिताने नितेशला फोन नंबर ची सगळी हकीकत सांगितली मग तिला थोडं बर वाटलं.
नितेश, “अग, त्यात काय एवढं… तो तुला काही त्रास देणार नाही आणि दिलाच तर आपण बघू मग”
पहिल्यांदा नितेश मोठा झाल्यासारखा निकीताला वाटला.
इकडे निखिल मात्र निकिताचा नंबर मिळाल्यामुळे खुश होता कारण त्याच्यामते त्याला निकीता सारखीच जोडीदार हवी होती...

Comments

Popular posts from this blog

मी जिजाऊ बोलतेय

पौष पौर्णिमा शके 1519 मध्ये म्हाळसा राणी आणि लखोजी राजे यांच्या घरी जन्माला आले तेव्हा दारा- दारांमध्ये रांगोळ्या काढल्या गेल्या, तोरण लावली गेली, हत्तीवरून साखर वाटण्यात आली.आमचं नाव जिजा ठेवण्यात आलं. जिजा म्हणजेच जय आणि विजय. आजूबाजूला सरदारांची वर्दळ, युद्धाचे डावपेच,सल्लामसलत, रयतेची गाऱ्हाणी...न्यायनिवाडे तर नित्याचेच हे असं होत आमचं बालपण. युद्धकला तर आम्ही शिकलोच होतो पण त्याचबरोबर 700 च्या वर आम्ही मुलींची 1 फौज तयार केली होती. पहाटे- पहाटे जेव्हा आम्ही घोड्यावरून रपेट करायला जायचो तेव्हा गावकुसातल्या काही बायका कौतुक करायच्या आणि काही नाकही मुरडायच्या, काही म्हणायच्या .. या पोरींचं कस होईल पण आम्ही निश्चय केलेला, स्वतः सोबत ...इतरांचं रक्षण करता आलं पाहिजे. म्हाळसा राणीच्या इच्छे खातर आम्ही 6 भाषा शिकलो,...मराठी, संस्कृत, उर्दू, अरबी, फारसी, कन्नड. रामायण- महाभारताबरोबरच, नामदेवांची गाथा, कबिराचे दोहे, कुराण, बायबल आम्ही वाचलं आणि समजूनही घेतलं आणि आमच्या मनात प्रश्न निर्माण झाला,...धर्म म्हणजे काय?..धर्म म्हणजे मानव सकल कल्याण कि कर्म कांड?, आम्ही तलवार चालवतो कुणासाठी?, प...

रेशीमगाठी... भाग १

भाग १ रे शीमगाठी वधू वर सूचक केंद्र ची फाईल वडिलांनी तिच्या हातात दिली आणि तिच्या पोटात गोळाच आला. आज पर्यंत नुसती चर्चा सुरु होती पण आता आई वडिलांनी लग्न हा विषय चांगलाच मनावर घेतला हे तिच्या लक्षात आलं आणि आपण खरंच लग्न कारण्याएवढं मोठं झालोय का, हा प्रश्न तिला पडला. वडिलांनी दिलेली फाईल घेऊन ती बेडरूम मध्ये गेली आणि त्यात असलेले कागदपत्र बघू लागली, त्यात बऱ्याच मुलांची माहिती होती. त्यातली काही बघितल्या सारखं केलं आणि लगेच मैत्रिणीशी चॅटिंग करायला सुरुवात केली. पण ...ती कोण? ती म्हणजे दिसायला बरी, रंग गोरा, पण उंची मध्ये मात्र मार खाल्ला (असं तिची काकी म्हणायची नेहमी) ती च नाव निकिता. निकिता अभ्यासात सामान्य पण बाकी नृत्य, गायन, खेळ यामध्ये नेहमी पुढे. मनाने साधी, कोणाला त्रास द्यायला आणि कोणि त्रास दिलेला हि आवडायचं नाही. तशीच तिची मैत्रीण सोनल. दोघींचा एकमेकांवर खूप जीव. शाळा , कॉलेज आणि पहिली नोकरी सुद्धा एकत्रच. तिला हे रेशीमगाठी च प्रकरण सांगितलं आणि मग निकिता चा जीव भांड्यात पडला. दोघीमंध्ये बराच वेळ गप्पा झाल्या. निकिता तिला आलेल्या टेन्शन बद्दल सोनल ला सांगत होती, अ...

डॉक्टर !!!

तो : काय रे डॉक्टर कधी येणार ? कंपाऊंडर : डॉक्टर साहेब काय आता येत नाहीत. तो : का रे ? वेळेत तर आलोय...माझ्या मुलीला फार ताप आलाय...नेहमी आम्ही याच डॉक्टरांकडे येतो... प्लीज त्यांना लवकरात लवकर कॉल करून बोलावून घे. कंपाऊंडर : अहो साहेब, नाई येणार ते… तो : असे कसे नाई येणार, तुला माहित नाही का मी कोण आहे ते… आत्ताच्या आत्ता फोन लावून बोलावून घे नाहीतर पार्टीतल्या लोकांना बोलावून तुझ्या त्या डॉक्टर च लायसेन्स रद्द करायला लावेन. जनतेची सेवा करायची करायची सोडून घरी आराम करत बसलाय काय? कंपाऊंडर : रागावू नका हो साहेब. मी ओळखलं तुम्हाला. पण परवाच एका विरोधी पक्षाच्या नेत्याचे वडील  अटॅक  येऊन गेले तर, कार्यकर्त्यांनी डॉक्टरांना मारहाण केली...लाथा- बुक्क्यांनी तुडवल आणि वर एकाने जाताना चाकू पण खुपसून गेला. आजच डॉक्टरांचं निधन झालं. बिचारे जाता - जाता पण….का डॉक्टर झालो म्हणत होते !!!