सुनिल : मला माहितीये बाबा, तुम्हाला सगळ्यांना मी फार त्रास दिलाय, त्याहीपेक्षा शोभाला. तिला कधीच कुठलंच सुख दिल नाही मी. पण आता मला माझी चूक कळलीये. बाबा, माझी इच्छा आहे की मी तिला घेऊन मुंबईला फिरून यावं.
परशुराम : (हसत) अगदी माझ्या मनातलं बोललास बघ. तुला हवं तिथे जा तिला घेऊन तिलाही बरं वाटेल, बिचारी दिवसभर राबते घरासाठी. तुमच्या दोघांचा संसार सुखाचा व्हावा हीच इच्छा राहिलीये.
ते दोघेही बाहेरच्या पडवीत बसले होते आणि शोभा भिंतीपलीकडून सगळं ऐकत होती. ते ऐकून तिच्या आनंदाला सिमा उरली नाही, तिच्या डोळ्यातून पाणी आलं आणि हसत-हसत ती देव्हाऱ्याजवळ गेली आणि देवाच्या पाया पडली. बेडरूममध्ये जाऊन तिने स्वतःचे केस नीट केले आणि आरशात स्वतःलाच पाहून लाजली. परशुरामने तिला चहासाठी आवाज दिला तेव्हा थोडी शांत झाली आणि चहा घेऊन बाहेर गेली. परशुरामने तिला सांगितलं सुनिल आणि ती दोघे मुंबईला जाणार आहेत तर तयारी करायला घ्या. हे ऐकून काही न बोलता शोभा फक्त हसली आणि लाजून आत गेली. तीच ते हास्य पाहून परशुरामला खूप बरं वाटलं. पण सुनिलच्या पुढच्या करस्थानाचा सुगावा मात्र कुणालाच नव्हता.
शोभाने कधी मुंबई पाहिली नव्हती पण तिच्या मैत्रिणींकडून बरंच ऐकलेलं. स्वप्नांची दुनिया आहे ती, झगमगती दुनिया, जो जाईल तो तिथलाच होऊन जातो….तिला खूप आकर्षण वाटायचं मुंबईचं आणि आता तिला तिथेच जाण्याचा योग आला होता.
जाण्याचा दिवस उजाडला. जाण्याची इच्छा असून सुद्धा मोठ्या भावासारखा अनिल आणि प्रेमळ बापासारखा परशुराम यांना तिला सोडून जावसं वाटतं नव्हतं.
परशुराम : हे बघ पोरी, फक्त ७ दिवसांची गोष्ट आहे.
शोभा : पण मामांजी, अनिल भाऊंच्या औषधाचं ?
परशुराम : अगं रखमा आहे आणि मीही लक्ष देईन, तु आमची अजिबात काळजी करू नकोस. बिनधास्त जा, मस्त रहा, मजा करा.
परशुरामने सुनिलला तर पैसे दिलेच होते पण तिच्याकडेसुद्धा काही पैसे दिले. दोघेही बॅग घेऊन तिथून निघाले. गावातुन आधी तालुक्याला जायला बसमध्ये बसले आणि तालुक्यातुन मग मुंबईची बस होती. शोभाने घरातुन जेवण बनवुन घेतले होते सोबत, मुंबईला जायला ६ तास लागणार होते. दुपारी बस थांबली आणि त्यांनी आणलेली भाजी भाकरी खाऊन घेतली. सुनिलच्या सांगण्याप्रमाणे त्याच्या मित्राचं घर तिथे होतं आणि आधी ते त्याच्या घरी जाणार होते. शोभा मनातल्या- मनात तिने ऐकलेल्या कोणत्या जागेवर जायचं हे ठरवत होती. पहिल्यांदाच एवढ्या लांबचा प्रवास ती करत होती त्यामुळे थोडी मनात भीती होती. सुनिल मात्र काही गडबड झाली तर या विचाराने, थोडा घाबरत होता. घाटातून जाताना, बाहेरचं सौंदर्य पहात शोभा हरपून गेली होती, मधेच आलेला बोगद्यामध्ये तर 2 सेकंद ती घाबरली. त्या काळोखातून जाताना मनावर अचानक दडपण आलं, बस जशी बोगद्यातून बाहेर पडली तसा तिचा जीव भांड्यात पडला. तिला इतका सुखावह आणि आनंददायी वाटणारा प्रवास तीच आयुष्य बदलणार होता याची तिला किंचितही शंका नव्हती.
हळूहळू थंड वाटणारी हवा, दमट बनत चालली होती, वातावरणातली गरमी जाणवु लागली होती. अंधार होत असल्यामुळे सगळीकडे दिवे लागले होते. खिडकीच्या बाहेर लाईट्स चं जाळं दिसु लागलं होतं, ते ती मनभरून पहात होती.
शेवटचा स्टॉप आला, सुनीलने शोभाला उतरायचा इशारा केला, दोघेही बसस्टँडवर उतरले. तिला सामानाजवळ उभं करून तो बाथरूमला जाण्याच्या बहाण्याने बाजुला गेला आणि त्याने कोणाला तरी कॉल केला. बोलून झाल्यावर तिच्याजवळ येऊन तो बोलू लागला.
सुनिल : माझ्या सोबतच रहा, मुंबई आहे ही. इकडे-तिकडे बघण्याच्या नादात हरवशील. फार उशीर झालाय, माझ्या मित्राने जेवायला बोलावलंय, आधी तिकडे जायचंय आणि मग जेवुन आपण तिथुन निघु.
शोभा मान डोलवत त्याचा हात पकडुन चालू लागली.
थोडं बाजूला उभं करून सुनिल एक रिक्षा घेऊन आला आणि सामान त्यात चढवुन दोघेही बसले. १० मिनिटे झाल्यावर रिक्षा एका वेगळ्याच भागात आली. तिथले काही लोक नशेमध्ये डुलत होते कोणी जोडीने फिरत होते, काही बायका अर्धनग्न अवस्थेत घराबाहेर उभ्या होत्या, कोणी विचित्र चाळे करत होतं…. तिथल्या वातावरणात वेगळीच अस्वस्थता जाणवू लागली होती तिला, त्या कोंदट वातावरणाचा त्रास होऊ लागला होता. तिने सुनिलकडे पाहिलं पण त्याला काहीच फरक पडत नव्हता त्या वातावरणाचा.
शोभा : अहो, मला इथे कसतरी होतंय. हवं तर आपण उद्या सकाळी येऊ या का ?
सुनिल : अगं, आपण कुठे इथे रहायला आलोय, त्याने एवढं प्रेमाने जेवायला बोलावलंय तर जेवुन जाऊ.
शोभा ची पुढे काही बोलायची हिम्मत नव्हती. थोड्यावेळाने ते एक जुन्या दुमजली इमारती जवळ गेले, शोभाला तिथे थांबवून तो वरती कोणाला तरी भेटायला गेला आणि हसत-हसत एक व्यक्तीबरोबर खाली आला. सुनिलने बॅग उचलली आणि तिला आपल्या मागून यायला सांगितले. तिथल्या दुसऱ्या मजल्यावर पहिल्या रूममध्ये ते गेले. त्या व्यक्तीने आतले दिवे लावले आणि बसा- बसा बोलून त्यांना बसवले. पाणी आणून दिले.
मी आलोच असं बोलुन ती व्यक्ती निघुन गेली.
शोभा थोडी अवघडल्यासारखीच बसलेली. थोड्यावेळाने तो माणूस बाहेरून जेवण घेऊन आला.
सुनिल : त्याची बायको माहेरी गेलीये, मलाही माहीत नव्हतं. म्हणून बाहेरूनच घेऊन आला. त्यांनी एक ताट भरून आणलं आणि पुढ्यात ठेवलं.
सुनिल : तु जेव. आम्हला वेळ लागेल. एवढ्या दिवसांनी भेटलोय खूप गप्पा मारायच्या आहेत
शोभा : नाही, नको मला. मी पण नंतरच जेवेन. भूक नाही मला.
सुनिल (रागात) : असं कसं भुक नाही. बाबांना कळालं तर रागावतील मला एवढ्या उशिरा तुला जेवायला दिल म्हणून.
शोभाने घाबरून इच्छा नसताना जेवायला सुरुवात केली. ते दोघे आतल्या रूममध्ये गेले तिथे दारू प्यायचा कार्यक्रम सुरू झाला. आतमध्ये तिघे जण असल्याचा तिला भास झाला. अर्ध जेवण कसतरी खाऊन तिने हात धुतला. दिवसभराच्या प्रवासाने कंटाळा आला होता आणि बराच उशिरही होत आला होता, तिला खूप झोप येत होती. तशीच ती झोपून गेली.
कौलाला पडलेल्या एका छोट्याशा छिद्रातुन येणारं ऊन जेव्हा तोंडावर पडलं तेव्हा तिचे डोळे उघडले, डोकं खूप जड झालं होतं. आजूबाजूला काहीचं दिसत नव्हतं तिने डोळे चोळले आणि पुन्हा नीट पहायचा प्रयत्न केला पण सगळीकडे अंधार होता. तोंडावर येणाऱ्या त्या कवडस्या पलीकडे अजिबात कसलाच उजेड नव्हता तिथे. अचानक तिच्या लक्षात आलं की तिच्या शरीरावर एकही कपडा आणि तिचे दागिनेही नाहीत, ती घाबरली, तिथून उठून स्वतःला लपवत तिने बेडवरच बेडशीट खेचून अंगाला गुंडाळून घेतलं. भीतीने ती थरथर कापत होती. तिने सुनिलला आवाज दिला, तीने संपूर्ण रूम पाहिली पण तिथे कोणी नव्हतं आणि तिचे कपडे, तिची बॅग, तेही नव्हतं. ती मोठमोठ्याने रडत होती, आक्रोश करत होती...पण तिचं ऐकायला कोणीच नव्हतं. खुप वेळ रडली, दरवाजा- खिडक्या उघडायचा प्रयत्न केला पण काही उपयोग नाही. या सगळ्या प्रयत्नात ती खूप थकली होती. रात्रीचा प्रसंग आठवायचा प्रयत्न करत होती. पण काल जेवल्यानंतर तिला झोप लागली आणि त्यानंतरचं तिला काहीही आठवत नव्हतं. बराच वेळ ती स्वतःला दोष देत बसलेली, सुनिलची तिला काळजी वाटू लागली, त्यालाही या लोकांनी पकडून कुठेतरी ठेवलं असेल. आता पुढे काय करायचं तिला काहीच सुचत नव्हतं. हळूहळू ऊन सरलं आणि येणारा कवडसा ही गायब झाला. थकून आता ती एका कोपऱ्यात बेडशीट गुंडाळून शांत बसलेली. तेवढ्यात तिला कसलीतरी चाहूल ऐकू आली. ती घाबरून बेडच्या दुसऱ्या बाजूला जाऊन लपली. कोणीतरी दरवाजा उघडत होतं. दरवाजा उघडून एक माणूस आता आला. काळा कुट्ट, कुरळे केस, वरच्या बाजुला वाळवलेल्या मिशा, शर्ट आणि लुंगी असा त्याचा अवतार होता. त्याने इकडे-तिकडे पाहिलं, जेवण भरलेलं ताट आणि तांब्याभर पाणी दारातून पुढे सरकवल आणि तो तिथुन निघून गेला. ती लगेच उठून ते पाणी प्यायली, जेवल्यावर तिच्यामध्ये थोडे त्राण आले तिने पुन्हा बरेच प्रयत्न केले दरवाजा उघडण्याचा पण सगळं व्यर्थ. २-३ दिवस हे असच चालू होतं. चौथ्या दिवशी सकाळी दरवाजा उघडण्याचा आवाज झाला आणि शोभा लपून बसली. पण यावेळेस मात्र एक स्त्री आत आली. शोभाने तिला पाहिलं पण ती घाबरून काही बाहेर आली नाही. त्या बाईच्या हातात शोभाचे कपडे होते तिने ते तिच्याजवळ टाकले शोभाने लगबगीने ते उचलले आणि घालायला सुरुवात केली. ती बाई आत आली तिने बाहेरून मेनस्विच चालू करून तिथला एक बल्ब लावला. अचानक आलेल्या त्या प्रकाशामुळे शोभाच्या डोळ्यांना त्रास झाला तिने डोळे बंद केले. तिने शोभाच्या खांद्यावर हात ठेवला शोभाने घाबरून खांदा झटकून ती पाठी सरकली. ती ४०-४५ च्या आसपासची एक जाडजूड स्त्री होती. तोंडावर भरभरून मेकअप, चापून-चोपून नेसलेली साडी, तोंडात पानाचा तोबरा, गळ्यात जाडजूड सोन्याची चैन, दोन्ही हातात सोन्याच्या बांगड्या, केसात मोगऱ्याचा गजरा…
अक्का : अरे घाबरतेस कशापाई, मी काही नाही करायची तुला…
शोभा : हे बघा, तुम्हाला हवे तेवढे पैसे देईन पण मला आणि माझ्या नवऱ्याला सोडून दया. कुठे आहे माझा नवरा ?
अक्का : हे बघ मुली…
(तीच वाक्य मधेच कट करत)
शोभा : मला मुली म्हणू नका, एवढं सगळं करून तुम्ही मला मुली म्हणता…लाज नाही वाटत तुम्हाला आम्हाला लुटून आणि असं डांबून ठेवायला ?
अक्का : कोणी लुटलं तुला ? आणि तुझा नवरा तो इथे नाही.
शोभा : मग कुठे आहेत ते ? मला भेटायचय त्यांना...
अक्का : अगं त्यापेक्षा आम्ही बरे…
शोभा : म्हणजे…?
अक्का : अगं, तो तुझा नवरा तुला विकून गेला इथे आणि तुझे दागिने आणि बॅग ही त्यानेच नेली…
शोभा ते ऐकताच तिच्या डोळ्यात चटकन पाणी आलं आणि ती सुन्नच झाली. ती बाई तिला बेडवर बसवते आणि पाणी देते प्यायला पण शोभाच्या डोळ्यातलं पाणी काही थांबत नसतं.
अक्का : हे बघ मुली. मला माहितीये लई वाईट घटना घडलीये तुझ्यासोबत, मला लई वाईट वाटतंय. मी इथं नव्हती तवा त्यांनी तुला इथं ज्या अवस्थेत डांबून ठेवलं होतं त्यासाठी मला माफ कर. पण तुझ्या नवऱ्याने तुला इथं विकलं आणि पैसे घेऊन पळून गेला. हे बघ त्या माणसाच्या भरोशावर तु इथं आलीस त्यांनच तुला दगा दिला. देव त्याच्यासोबत कधीच चांगलं होऊ देणार नाई बघ. तु रडू नकोस, चल खाऊन घे.
शोभा : (तिचे पाय पकडते) मला माफ करा पण मी तशी नाही हो. मला माझ्या घरी जाऊ द्या.
अक्का : तुला आता ही जागा नक्की काय आहे हे कळलं असेलच...
शोभा : हो.
अक्का : हे बघ पोरी, सगळ्याच मुली इथे अशा आणल्या जात नाहीत पण बऱ्याच स्वतःचं आणि स्वतःच्या पोरा-बाळाचं पोट भरण्यासाठी इथं हे काम करतात. हे काम वाईट जरूर आहे. इथं काही माणसं वाईट आहेत पण सगळीच माणसं वाईट न्हाईत. दोन घास खाऊन घे पोरी.
शोभाला मात्र स्वतःचीच लाज वाटत होती. नक्की काय कमी पडली तिच्या प्रेमात की सुनिलने तिच्याशी असं वागावं.
क्रमशः
Comments
Post a Comment